पंढरपूर : कार्तिकी यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. या यात्रा कालावधीत प्रशासनाने स्वच्छतेला प्राधान्य द्यावे तसेच मंदिर समितीने भाविकांना आवश्यक सुविधाबरोबरच सुलभ व सुखकर दर्शन देण्याचे नियोजन करावे. तसेच ‘व्ही आय पी’ दर्शन बंद ठेवावे अशा सूचना राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या.
कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत केबीपी कॉलेज, महाविद्यालय येथील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस शिक्षणमंत्री दादा भुसे, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे ,अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, एसटी महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीमती अमृता ताम्हणकर, ह.भ.प राणा महाराज वासकर तसेच संबधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी सरनाईक म्हणाले, की आषाढी कार्तिक यात्रेतही चांगल्या सुविधा द्याव्यात. यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीपात्र व वाळवंट येथील स्वच्छता ठेवावी. तसेच चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर येथे मुरूम खडी टाकल्यानंतर तात्काळ रोलिंग करून घ्यावे, विशेषता प्रदक्षिणा मार्गावर मोठ्या प्रमाणात दिंड्या बरोबर वारकरी भाविक अनवाणी चालत प्रदक्षिणा घालतात यावेळी त्यांच्या पायांना कच खडी लागणार नाही याची प्रामुख्याने दक्षता घ्यावी, असे आदेश त्यांनी दिले.
दिंडी सोहळ्यांनी प्रथा परंपरेप्रमाणे टाळ मृदंगाच्या गजरात प्रदक्षिणा पूर्ण करावी. लाऊड स्पीकर वापर करू नये. यात्रा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात दिंड्या पंढरपूरहुन आळंदीकडे रवाना होतात. या दिंड्यांना आवश्यक सुविधा देण्याबरोबरच परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाने मार्गावर सुरक्षा व्यवस्था देण्याबाबत तात्काळ अंमलबजावणी करावी. कार्तिकी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी १०५० बसची व्यवस्था करण्यात आली आहे. पंढरपूर शहरात येणाऱ्या सर्वच मार्गावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी तात्काळ बुजवावेत. तसेच पंढरपूर शहरातील खड्डे नगरपालिका प्रशासनाने तात्काळ बुजवावेत अशा सूचनाही परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिल्या.
पिण्याचे स्वच्छ पाणी, औषधसाठा ठेवा – भुसे
कार्तिकी यात्रा कालावधीत मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरला येतात. भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, मुबलक प्रमाणात औषधसाठा उपलब्ध ठेवावा. तसेच वारकरी भाविकांना सुलभ व सुखकर दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. पाटबंधारे विभागाने नदीपात्रातील पाणी पातळी नियंत्रित राहील याची दक्षता घ्यावी. तसेच नगरपालिका प्रशासनाने वाळवंटात तात्पुरते शौचालय, स्वच्छता, प्रखर प्रकाशव्यवस्था आदी सुविधा उपलब्ध ठेवाव्यात.तसेच चंद्रभागा वाळवंट कायमस्वरूपी स्वच्छ राहील याबाबत शासन स्तरावर नियोजन करण्यात येणार असल्याचेही शिक्षण मंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले. आमदार समाधान आवताडे यांनी यात्रा कालावधीत दर्शन रांगेत पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी. वीज वितरण कंपनीने अखंडित वीजपुरवठा करावा, अशा सूचना यावेळी केल्या.
