सावंतवाडी : दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील हेवाळे, मोर्ले, केर, कोलझर, तळकट, शिरवल या गावांमध्ये धुमाकूळ घालून शेती आणि बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या जंगली हत्तींना पकडण्यासाठी वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याच्या निषेधार्थ सरपंच सेवा संघटना सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रवीण गवस यांनी सोमवारीपासून दोडामार्ग येथील वन विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

यापूर्वी हत्ती पकड मोहीम राबवण्याच्या मागणीसाठी उपोषण आंदोलन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही वन विभागाने कोणतीही दखल घेतली नाही. याच दरम्यान मोर्ले गावात एका शेतकऱ्याचा हत्तींच्या हल्ल्यात बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर तातडीने हल्ला करणाऱ्या हत्तीला पकडण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु वन विभागाकडून याबाबतही कोणतीही कार्यवाही झाली नाही.

या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या प्रवीण गवस यांनी आज दोडामार्ग वन विभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले असून, या आंदोलनाला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. सहाय्यक वनसंरक्षक व्ही. एस. बोराटे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी हत्ती पकड मोहिमेबाबत कर्नाटक सरकारकडे तसेच गुजरातच्या वनतारा संस्थेकडे प्रस्ताव सादर केले असल्याचे सांगितले.

मात्र, प्रवीण गवस यांनी हत्ती पकड मोहीम कधी होणार हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत आपले आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील हत्तींच्या त्रासाने त्रस्त असलेल्या ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वन विभागाच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात गेल्या २५ वर्षांपासून हत्तींचा कळप धुमाकूळ घालत आहे. शेती बागायती पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान हत्तींनी केले आहे. सध्या सहा हत्तींचा वावर दोडामार्ग तालुक्यात आहे. मोर्ले येथे शेतकऱ्याचा बळी ओंकार नामक हत्तीने घेतल्यानंतर ओंकार हत्तीला पकडण्याचा निर्णय वन विभागाने घेतला. मात्र अंमलबजावणी करण्यासाठी चालढकल सुरू आहे. गेल्या २५ वर्षात हत्तींचा वावर असलेल्या परिसरामध्ये हत्ती येणार नाही अशी खबरदारी वन विभागाने घेतली नाही. शेती व बागायती वर शेतकरी अवलंबून आहेत. त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. ओंकार हत्तीला पकडण्याचा निर्णय घेतला असला तरी सध्या आणखी पाच हत्तींचा वावर आहे. त्यांचे काय करायचे? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.