भारतात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर महाराष्ट्रातही शेतकरी मान्सूनची वाट पाहत होता. मुंबईत ११ जूनपर्यंत मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता आहे. स्कायमेट वेदर या भारतीय हवामान अंदाज व्यक्त करणाऱ्या कंपनीने याबाबत ट्विटही केले आहे. तसेच यंदा सरासरीपेक्षा ३७ टक्के पाऊस कमी पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
केरमध्ये मान्सूनचे आगमन
मोसमी पाऊस यंदा वेळेच्या दोन दिवस अगोदरच भारतात दाखल झाला. अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्य येत असल्याने आठवड्याच्या कालावधीतच महाराष्ट्रात मोसमी पावसाचा प्रवेश होण्याबाबत अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, वाऱ्यांचा वेग कमी झाल्याने अडथळा निर्माण झाला होता. मात्र, आता भारतातील अनेक भागात मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे.
दोन दिवसांमध्ये कोकणात मोसमी पाऊस दाखल
समुद्रातून येणाऱ्या बाष्यामुळे सध्या महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह इतर भागांतही पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. १० जूनपासून या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. परिणामी येत्या दोन दिवसांमध्ये कोकणात मोसमी पाऊस दाखल होऊ शकतो. कोकणात पोहोचतानाच दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांतही मोसमी पाऊस दाखल होणार आहे.