जनतेच्या कामात हलगर्जीपणा आता सहन केला जाणार नाही. जनतेच्या तक्रारी प्राधान्यक्रमाने सोडवाव्या. यापुढे कंत्राटदारांसोबत हातमिळवणी करून संपत्ती जमा करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. ऊर्जामंत्र्यांच्या इशाऱ्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सभागृहात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी जनता दरबार घेतला. यावेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार बळीराम सिरस्कार, महापौर विजय अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि महावितरणचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जनतेच्या कामात दिरंगाई न करता तातडीने उपाययोजना करून प्रकरणांचा निपटारा करण्याचा शासनाचा मानस आहे. ऊर्जा खात्याचाही तसा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्य़ात जनता दरबार घेऊन तक्रारींचा निपटारा करण्यात येत आहे. मात्र, महावितरणचे काही अधिकारी, कर्मचारी आपल्या भ्रष्ट प्रवृत्तीने कामांना विलंब लावतात. अशांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. वीजजोडणी, जास्त देयके लावणे, तक्रारींचा निपटारा मुदतीत न करण्याच्या तक्रारी येत आहेत. त्या त्वरित सोडविण्याचे निर्देश ऊर्जामंत्र्यांनी दिले. विदर्भातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची संपत्ती तपासा, असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. अकोल्याच्या जनता दरबारात एकूण १०६ तक्रारी प्राप्त झाल्या असून ३० जूनपर्यंत त्या सर्व तक्रारी सोडविण्याचे निर्देश ऊर्जामंत्र्यांनी दिले असून, त्यानंतर पुन्हा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तीन अधिकाऱ्यांवर कारवाई

ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ग्राहकांचे समाधान करणे हे प्रथम कर्तव्य असून प्रत्येक अधिकाऱ्याने त्याचे पालन करावे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.