कर्जत: अतिवृष्टीमुळे सर्वच क्षेत्रातील कामे बंद आहेत. असंघटित कामगारांच्या हाताला काम नाही. यामुळे दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न उपस्थित करत कर्जतमध्ये असंघटित कामगारांनी हातामध्ये फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. सरकारने दिवाळीसाठी असंघटित कामगारांना दहा हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी करणारे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
राज्य सरकारने अद्याप असंघटित कामगारांसाठी कोणतेही दिवाळी अनुदान जाहीर केलेले नाही याकडे बांधकाम व इतर क्षेत्रातील असंघटित कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर भैलुमे यांनी लक्ष वेधले. यावेळी निसार शेख, अशोक डाडर, पुनम समुद्र, आशा माने, शालन मोहिरे, शाहीन शेख, कांतिलाल भिसे, राहुल अडसूळ, शबाना बागवान, योगेश चव्हाण आदींसह संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोषणाबाजीने तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता.
भैलुमे यांनी सांगितले की, अतिवृष्टीने शेतकऱ्यांप्रमाणेच कामगारांचाही प्रपंच उद्ध्वस्त झाला आहे. रोजचं उत्पन्न बंद, घरात सण साजरा करण्याची चिंता, आणि कुटुंबाची अपेक्षा या सर्वांमध्ये कामगारांच्या घरात आज फक्त हळहळ आहे. यंदा दिवाळी कशी साजरी करायची हा प्रश्न प्रत्येक असंघटित कामगाराच्या मनात सलतो आहे.
मागील वर्षी देखील संघटनेने आंदोलन केल्यानंतर सरकारने पाच हजार रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली होती. परंतु आचारसंहितेमुळे ते अनुदान थांबले आणि असंघटित कामगारांची दिवाळी अधुरी राहिली, असे सांगून श्री भैलुमे म्हणाले, आम्हाला सणाचा आनंद हवा, आश्वासन नव्हे. सरकारने दोन दिवसांत अनुदानाची घोषणा न केल्यास राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर कामगार एकत्र येऊन आंदोलन करतील.
यावेळी निसार शेख म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी असंघटित कामगारांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. कामगारांच्या हाताला काम नाही. घरांची पडझड झाली आहे. दसऱ्याचा सण साजरा केला नाही. सरकारने तत्काळ आम्हाला मदत करावी.
यावेळी महिला कामगारांनी विविध समस्या मांडल्या. आमची घरे पडली आहेत. हाताला काम नाही, बांधकामे बंद आहेत. शेतामध्ये काम नाही. यामुळे सरकारने तत्काळ दहा हजार रुपये कामगारांना द्यावे, अशी मागणी महिला कामगारांनी केली. कामगार संघटनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
