महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी १२ तारखेला झालेल्या ठाण्यातील मनसेच्या उत्तर सभेमध्ये मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. ईदपर्यंत म्हणजेच ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्यात आले नाही तर आम्ही मशिदींसमोर भोंग्यावर तितक्याच आवाजामध्ये हनुमान चालीसा लावू असा इशारा राज यांनी दिलाय. मात्र आता याच मागणीवरुन पुण्यामधील प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी राज ठाकरेंवर थेट निशाणा साधलाय. इतकच नाही तर राज ठाकरे न्यायालयाने निकाल दिल्याचा खोटा दावा करत असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा असं आपलं वैयक्तिक मत असल्याचंही सरोदे यांनी म्हटलंय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: BJP युपीसहीत एकूण १८ राज्यांमध्ये सत्तेत पण एकाही राज्यात भोंग्यांवर बंदी नाही; गुजरातमध्ये तर न्यायालयाने…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“राज ठाकरे ज्या पद्धतीने विषय मांडत आहेत ती अगदीच चुकीची आहे. त्यामधून धार्मिक तेढ निर्माण होण्याचं काम सुरु झालंय असं आपण बघू शकतो. जर मशिदींवरील भोंगे काढले नाही तर आम्ही तिथे भोंगे लावून दुप्पट आवाजात हनुमान चालीसा म्हणून असं म्हणणं चुकीचं आहे,” असं सरोदे म्हणाले. तसेच पुढे बोलताना, “याला कायदेशीर पद्धतीने पाहिलं तर भारतातील कोणत्याही न्यायालयाने मशिदीवरील भोंगे काढा असा निर्णय कधीही दिलेला नाही,” असंही सरोदे म्हणाले.

“राज ठाकरेंना माझं आव्हान आहे की त्यांनी दाखवून द्यावा एक निर्णय कोणताही की ज्यामध्ये न्यायालयाने म्हटलं आहे की मशिदीवरील भोंगे काढा. असा निर्णय असेल तर राज ठाकरेंनी तो दाखवून घ्यावा न्यायालयाचा हवाला देऊन खोटं बोलण्याचा अधिकार राज ठाकरेंना नाही. न्यायालयाचा हवाला देऊन ते जर खोटं बोलत असतील तर तो न्यायालयाचा अपमान आहे. माझ्या मते यासाठी त्यांच्याविरोधात गुन्हेगारी स्वरुपाची केस दाखल झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे,” असं रोखठोक मत सरोदे नोंदवलं आहे. राज ठाकरे यांच्यासहीत भाजपाकडूनही २००५ मधील उच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत भोंगे हटवण्याची मागणी केली जातेय.

“दुसरा मुद्दा हा आहे की ध्वनी प्रदुषण हा गंभीर महत्वाचा मुद्दा असून तो सामाजिक स्वास्थासाठी हानीकारक आहे. आपण सर्व नागरिकांनी मिळून सामाजिक स्वास्थाचा भाग म्हणून एकत्र येऊन ध्वनी प्रदुषणाच्याविरोधात काम केलं पाहिजे. कोणत्याही मशिदीवर भोंगा असण्याची गरज नाही. कोणतेही सण उत्सव, काकड आरत्या भोंग्यावरुन करण्याची गरज नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे,” असं सरोदे म्हणाले.

“आवाज ऐकून ऐकून आपली ऐकण्याची क्षमता कमी कमी होऊन आपण बहिरेपणाकडे चाललोय हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. याचा न्यायिक भाग पाहिला तर सरकारने जे ध्वनी प्रदुषण करत असतील त्यांच्याविरोधात मग ते मशिदीवरचे भोंगे असो, मंदिरावरील लाऊडस्पीकर्स असो, गुरुद्वारावरचे असो की कुठलेही असो त्यांच्याविरोधात सरकारने समानतेने कारवाई केली पाहिजे तरच मला वाटतं की समाजातील ध्वनी प्रदुषण कमी होईल.
चांगल्या स्वास्थासाठी शांतता आवश्यक आहे हे आपण स्वीकारलं पाहिजे,” असं सरोदे यांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune based advocate asim sarode slams raj thackeray scsg