सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राच्यावतीने महात्मा बसवेश्वर यांचे जीवन आणि कार्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू करणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी दिली.विद्यापीठातील महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राच्या सल्लागार समितीची बैठक कुलगुरू डॉ. महानवर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राच्यावतीने अल्प कालावधीचे विविध अभ्यासक्रम तयार करणे आणि हे अभ्यासक्रम सर्व इच्छुकांना उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
महात्मा बसवेश्वरांच्या जीवन आणि वैचारिक मूल्यांवर आधारित असलेली ग्रंथसंपदा संकलित करून कायमस्वरूपी जतन करून ठेवण्याचेही निश्चित करण्यात आले. ग्रंथांचे मराठी, कन्नड आणि इंग्रजीमध्ये अनुवाद करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. महात्मा बसवेश्वर विश्व संवाद सदन आणि महात्मा बसवेश्वर आयुर्वेदिक उद्यान उभारण्यासाठी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे ठरले.
महात्मा बसवेश्वरांच्या जीवन कार्यावर आधारित व्याख्याने, चर्चासत्र आणि कार्यशाळांचे आयोजन करणे तसेच अध्यासन केंद्राच्या वतीने श्री सिद्धेश्वर देवस्थान समिती आणि महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध संस्था व महाविद्यालयासोबत सामंजस्य करार करण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. महानवर यांनी सांगितले. या बैठकीस विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, वित्त व लेखाधिकारी डॉ. महादेव खराडे, मानवविज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. वसंत कोरे, महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांच्यासह सदस्य प्राचार्य गजानन धरणे, महादेव न्हावकर, स्वाती महाळंक, सुरेश शहापूरकर, राहुल पावले उपस्थित होते.