नीरज राऊत
तारापूर अणुऊर्जा प्रकल्प (टॅप्स) तसेच तारापूर येथील भाभा अणु संशोधन केंद्रामध्ये (बीएआरसी) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या परदेशातून आलेल्या पाच मुलांना अलगीकरण करण्याच्या सूचना पालघरच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिले आहेत. परदेशातून परतल्यानंतर या युवकांनी शासकीय व्यवस्थेला कळवलं नव्हतं. अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या युवकांसोबतच अणु उर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या त्यांच्या पालकांना देखील रजेवर व घरी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तारापूर येथील अणु उर्जा आयोगाची संबंधित या दोन केंद्रांमधील कर्मचाऱ्यांची मुले शिक्षणासाठी परदेशी राहत होती. करोना आजाराच्या संसर्गाची भीती जगभरात पसरू लागल्याने बीएआरसी मधील तीन तर तारापूर अणुऊर्जा केंद्र मधील दोन युवक काही दिवसांपूर्वी बोईसर येथे परतले होते. त्यांनी याबाबत माहिती तालुका आरोग्य विभाग किंवा पोलिसांना दिली नव्हती. एकीकडे राज्य सरकार करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कठोर उपाययोजना आखत असताना परदेशवारी करून आलेली हे तरुण बिनधास्तपणे वावरत असल्याने ही बाब जागरुक नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली.
जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन या दोन्ही कर्मचारी वसाहतींमध्ये घरोघरी जाऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. पॅरिस, फिलिपीन्स, नेदरलँड, इंग्लंड व अमेरिका येथून हे पाच युवक आले असून त्यांन आपल्या घरामध्ये अलगीकरण करण्याच्या सूचना आरोग्य पथकाने दिले आहेत. त्याचप्रमाणे या दोन्ही वसाहतीमध्ये आणखी परदेशातून आलेल्या आठ- दहा इतर संभाव्य युवकांचा शोध घ्यायचे काम सुरू झाले असल्याची माहिती देण्यात आली.
पालघरचे उपविभागीय अधिकारी विकास गजरे, तहसीलदार सुनील शिंदे, गटविकास अधिकारी चंद्रशेखर जगताप, तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत खंडारे यांच्या पथकाने आज टॅप्स व बीएआरसीच्या केंद्रप्रमुख यांची भेट घेतली. या दोन्ही केंद्रातील उच्चपदी अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या बेजबाबदारपणा बाबत नाराजी व्यक्त करून करोना संसर्ग टाळण्यासाठी शाशनाने आखलेल्या उपाययोजनांची अपेक्षित अंमलबजावणी न केल्याबाबद्दल अधिकारी वर्गाची खरडपट्टी काढली. या अणुऊर्जा प्रकल्पाची संबंधित दोन्ही केंद्र अत्यावश्यक सेवेमध्ये येत असल्याने या ठिकाणचे तृतीय व चतुर्थ श्रेणी कामगारांची संख्या कमी करणे, कंत्राटी कामगारांच्या तपशीवार नोंद ठेवणे व त्यांचे आरोग्य जपणे तसेच आवश्यक असतील तितक्या संख्येत कंत्राटी कामगारांना कामावर घेणे अशा सूचना पालघरचे उपविभागीय अधिकारी विकास गजरे यांनी दिल्या आहेत.
परदेशी प्रवास केलेल्या नागरिकांच्या संख्येत वाढ
परदेशवारी करून जिल्ह्यात दाखल झालेल्या नागरिकांची संख्या आज ६८ ने वाढून ३३१वर पोहोचली आहे. त्यापैकी ६२ नागरिकांचा करोना संसर्गाचा धोका टाळला असून आजाराचे चिन्ह दाखविणाऱ्या १४ संशयितांच्या चाचण्या नकारात्मक आल्या आहेत. परदेशातून जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात ११० नागरिक दाखल झाले असून यापुढे अशा प्रवाशांची यादी उपलब्ध होणार असल्याने आरोग्य विभागाला त्यांचासोबत पाठपुरावा करणे सोपे होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने आज पत्रकार परिषदेत दिली.