सातारा: नरक चतुर्दशीपासून सुरुवात झाल्यानंतर सातारकरांनी शहरासह जिल्हाभरातील मंदिरात पुरातन मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. या मंदिरांमध्ये सातारकर श्रद्धापूर्वक दर्शन घेऊन दिवाळीच्या एकमेकांना शुभेच्छा देत आनंद द्विगुणीत करत आहेत.
दिवाळीमध्ये आणि साडेतीन मुहूर्ताला सातारकर नेहमीच ग्रामदेवतांच्या दर्शनाला प्राधान्य देत असतात. यंदाही दिवाळीनिमित्त या परंपरेनुसार शहरासह परिसरातील विविध मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे.
समर्थ मंदिर चौकातील ढोल्या गणपती हे साताऱ्याचे ग्रामदैवत आहे. या ठिकाणासह कुर्णेश्वर खिंडीतील गणपती, गारेचा गणपती, कोटेश्वर मंदिर, यवतेश्वर, पंचमुखी गणपती, फुटका तलाव गणेश मंदिर, पंचमुखी मारुती, शनी मंदिर, किल्ले अजिंक्यतारा वरील मंगळाई, तटाखालील मंगळाई, गुरुवार पेठ येथील ज्योतिबा मंदिर, गडकर आळी येथील महालक्ष्मी तसेच पेढ्याचा भैरोबा करंजे येथील भैरोबा, शहर पोलीस ठाण्यासमोरील तुळजाभवानी मंदिर, खंडोबाचा माळ येथील पुरातन खंडोबा मंदिरात, गोडोली येथील साई मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. अनेक ठिकाणी फटाक्यांचे आतषबाजी करत आबाल वृद्धांसह युवक दर्शनासाठी मंदिरात गर्दी करत आहेत. तरुणाईनेही युवती महिलांनीही देवदर्शनासाठी आपला मोर्चा मंदिरांकडे वळवल्याचे दिसून आले. दिवाळी निमित्त या मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
लक्ष्मीपूजनचा आज मुहूर्त असल्याने पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदी बरोबरच लक्ष्मी मूर्तीच्या खरेदीकडेही अनेकांचा कल असल्याचे दिसून आले. दिवाळीनिमित्त शाहूपुरी येथील दिवाळी पहाट कार्यक्रम साजरा झाला. सातारा कास रस्त्यावरील यवतेश्वर येथील शंभू महादेव मंदिरातही सातारकरांनी मोठी गर्दी केली आहे. धर्मसिंधू निर्णय सिंधू ग्रंथा नुसार तीन प्रहर अपेक्षा जास्त वेळ अमावस्या असल्याने मंगळवारीच लक्ष्मी पूजन करण्यात येत आहे, असे भटजी मंदार चित्राव यांनी सांगितले.
दिवाळीनिमित्त बाजारात मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आवक झाली आहे. आवक जास्तीची झाल्याने सोमवारी आणि मंगळवारी फुलाचे दर कमी झाल्याचे दिसून आले. दर कमी झाल्याचा फटका शहरालगतच्या उत्पादकांना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.
वाई येथील महागणपती मंदिर, मांढरदेव येथील काळुबाई मंदिर, औंध येथील यमाई, देऊर येथील मुधायी, पाली येथील खंडोबा, बावधन येथील काळभैरवनाथ मंदिरात मोठी गर्दी होत आहे. लक्ष्मीपूजन आणि दिवाळी साजरी झाल्यानंतर सर्वच मंदिरांमध्ये गर्दी वाढेल, असे वाई येथील महागणपती मंदिराचे ट्रस्टी केदार व शैलेद्र गोखले यांनी सांगितले.