गेल्या काही वर्षांत अडगळीत पडलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे राजकीय पुनर्वसन व्हावे, यादृष्टीने नांदेडसह मराठवाडय़ातल्या अन्य जिल्ह्य़ांतील काँग्रेसचे काही लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची एकजूट होत असतानाच पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी मात्र त्यांच्या नागपूर दौऱ्यात याबाबत कोणतेही भाष्य करण्याचे टाळले!
दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांची भेट घेण्यास नांदेडहून जम्बो शिष्टमंडळ गेले होते. शिष्टमंडळाला युवराजांनी वेळ दिला खरा; पण त्यातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वगळता अनेकांचा भ्रमनिरास झाला. मराठवाडय़ात काँग्रेसची ताकद वाढविण्यास अशोक चव्हाणांचे राजकीय पुनर्वसन होणे आवश्यक असल्याचे शहराध्यक्ष दिलीप कंदकुत्रे यांनी निदर्शनास आणून दिले. पण, राहुल गांधी यांनी याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. माजी मुख्यमंत्री चव्हाण, पालकमंत्री डी. पी. सावंत, खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह काही आमदार व पदाधिकाऱ्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.
चव्हाण यांच्या पुनर्वसनाबाबत राहुल गांधी यांनी कोणतेही भाष्य न केल्याने अनेकांचा भ्रमनिरास झाला. पण गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे निष्ठेने काम करणाऱ्या जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांना मात्र दिलासा मिळाला! ज्या दोन-चारजणांना बोलण्याची संधी मिळाली होती, त्यात कदमकाकांचाही समावेश होता. कदम यांनी या वेळी बोलताना मोतीलाल नेहरू यांनी पक्षासाठी दिलेल्या योगदानाचा सुरुवातीलाच उल्लेख करून युवराजांना प्रभावित केले. आपल्या मनोगतात त्यांनी ग्रामीण भागातील जनतेशी निगडित असलेले काही मुद्दे मांडले. नंतर राहुल गांधी यांनी कदम यांना काही प्रश्न विचारले. किती वर्षांपासून पदाधिकारी आहात? त्यासाठी निवडणूक झाली होती का? आपण कोणत्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवली का? असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. कदम यांनी या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर युवराजांनी त्यांना थेट विधानसभा निवडणूक लढवणार का? असा प्रश्न केला आणि आपली तशी इच्छा असल्याचे उत्तर कदम यांनी डी. पी. सावंत यांच्या साक्षीने दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi keep silence on ashok chavan