शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ दि. १४ ला सायंकाळी ४ वाजता शिर्डी येथे काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हेदेखील सभेस उपस्थित राहणार आहेत. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांना आज गांधी यांच्या सभेची माहिती देण्यात आली. त्यानंतर सभेच्या तयारीला प्रारंभ सुरू झाला आहे. गांधी हे नगर जिल्हय़ात प्रथमच येत आहेत. यापूर्वी जिल्हय़ात काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सभा झालेल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची नगर येथे दि. १२ रोजी सभा होत आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या राहुरी येथील दौऱ्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार शंकर गडाख हे खासदार वाकचौरे यांच्या प्रचारात सहभागी झाले. कृषिमंत्री विखे व आमदार गडाख यांनी आज भेंडे, भानसहिवरे, नेवासे, पाचेगाव येथे सभा घेतल्या. विखे समर्थक बाळासाहेब मुरकुटे व दिलीप वाकचौरे यांच्याकडून राजकारणात त्रास दिला जात असल्याने गडाख हे प्रचारात सक्रिय नव्हते. पण आता त्यांनी सभांमध्ये सहभाग घेतला. यापूर्वी विखे व वाकचौरे यांच्या सभांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. विशेष म्हणजे काही सभा रद्द कराव्या लागल्या होत्या, पण आजच्या सभांना मात्र चांगला प्रतिसाद मिळाला.
शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ शहरात दि. ११ला सायंकाळी ४ वाजता सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. पूर्वी ही सभा दि. १२ होणार होती. पण मोदी यांच्या नगरच्या सभेमुळे आता बदल करण्यात आला असून एक दिवस आधी ठाकरे यांची सभा होत आहे.