सांगली : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघामध्ये अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले असताना, या नुकसानीच्या पंचनाम्यांमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी अखेर दूर झाल्या आहेत. माजी खासदार संजय पाटील यांच्या तातडीच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारकडून त्वरित त्याबाबतचे आदेश देण्यात आल्याने, आता नुकसानग्रस्त द्राक्षबागांचे पंचनामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याची आशा वाढली आहे.
दरम्यान, तासगाव येथे अधिकाऱ्यांच्या विशेष आयोजित बैठकीत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या पंचनामाबाबत हयगय केलेली खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा दिला. या बैठकीला प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अतुल पाटोळे, तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे, सहायक बिडीओ गावडे उपस्थित होते. द्राक्ष हे नगदी पीक असून, त्याचे प्रचंड नुकसान झालेले आहे. मात्र, काही तंत्रिक अडचणीमुळे त्याला नुकसान भरपाई मिळण्यासाठी अडचणी होत्या. माजी खासदार संजय पाटील यांनी तातडीने दिल्ली दरबारी धाव घेतली. त्यांनी थेट केंद्रीय कृषी राज्यमंत्री यांच्याशी संपर्क साधून द्राक्ष पंचनाम्यातील अडचणींची माहिती दिली. द्राक्ष संशोधन केंद्राच्या तपासणीत नुकसानीचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक स्पष्ट झाले होते. मात्र, पंचनाम्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबींमध्ये येत असलेल्या अडथळ्यांमुळे पंचनाम्याचे काम थांबले होते.
केंद्र सरकारने राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राला आवश्यक त्या सूचना दिल्या. केंद्राच्या आदेशानंतर तातडीने काम करत, नुकसानीच्या संदर्भात ४० टक्के दुरुस्तीचा अहवाल प्रशासनाकडे सादर केला आहे. हा अहवाल मिळाल्यामुळे आणि केंद्राने हिरवा कंदील दाखवल्यामुळे आता प्रशासकीय स्तरावर द्राक्ष बागांच्या पंचनाम्यांमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण राहिली नाही, असे पाटील यांनी सांगितले.