Raj Thackeray : प्रबोधनकार ठाकरे यांची आज जयंती आहे. प्रबोधनकार ठाकरे अर्थात केशव सीताराम ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतले पुढारी होते. रायगडच्या पनवेल या ठिकाणी जन्मलेल्या केशव ठाकरे यांनी महात्मा फुलेंना त्यांचं आदर्श मानलं होतं. महात्मा फुलेंच्या साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाज सुधारणांबाबतच्या त्यांच्या संकल्पना आणखी स्पष्ट झाल्या. सनातन्यांनी महात्मा फुलेंचा छळ केला होता. त्यामुळे सनातन्यांच्या विरोधातला लढा प्रबोधनकारांनी पुण्यातच सुरु केला.
सामाजिक सुधारणा हे प्रबोधनकारांच्या जीवनाचं ध्येय
सामाजिक सुधारणा हेच प्रबोधनकार ठाकरेंच्या जीवनाचे ध्येय होते. त्यांनी ध्येयप्राप्तीसाठी कधीच कोणतीही तडजोड केली नाही. मग भले बालविवाह व विधवांच्या केशवपनाची अभद्र रूढी असो, देवळांमधील ब्राह्मण पुजाऱ्यांची अरेरावी, हुकूमशाही असो, अस्पृश्यतेचा प्रश्न असो किंवा हुंडाप्रथेचा प्रश्र्न असो; ते या सर्व आघाड्यांवर अखेरपर्यंत त्वेषाने लढत राहिले. प्रबोधनकार हे लेखक, पत्रकार व इतिहास संशोधकही होते. त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला. कोदंडाचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड, देवांचा धर्म की धर्माची देवळे, ग्रामधान्याचा इतिहास, कुमारिकांचे शाप, वक्तृत्वशास्त्र इत्यादी ग्रंथासह समर्थ रामदास, संत गाडगे महाराज, रंगो बापूजी, पंडिता रमाबाई, माझी जीवनगाथा (आत्मचरित्र) ही चरित्रे – अशा साहित्यसंपदेची त्यांनी निर्मिती केली. याच प्रबोधनकारांसाठी राज ठाकरेंनी पोस्ट लिहिली आहे जी चर्चेत आली आहे.
काय आहे राज ठाकरेंची पोस्ट?
आज आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती… आजोबांनी वक्तृत्व, लेखन आणि प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रं वापरून पुराणमतवाद्यांशी दोन हात केले. महात्मा ज्योतिबा फुलेंचं साहित्य हे आमच्या आजोबांचं प्रेरणास्रोत. यातूनच त्यांच्या समाजसुधारणेच्या कल्पना पुरेशा स्पष्ट झाल्या आणि त्यानंतर आजोबांनी सामाजिक कार्याचा पाया घातलाच पण त्यात ढवळाढवळ करणाऱ्यांची पार दाणादाण उडवून दिली.
ठाकरे कुटुंबाला ओळख मिळाली ती आजोबांमुळेच-राज ठाकरे
आज जेंव्हा एखाद्या कळकळीच्या विषयवार तरी भूमिका घ्या म्हणून साहित्यिक आणि कलाकारांना सांगावं लागतं, त्यावेळेस समाजसुधारणेची स्पष्ट भूमिका घेऊन अफाट साहित्य निर्माण करून वेळेस अंगावर येणाऱ्या सगळ्या पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणाऱ्या आमच्या आजोबांच कौतुक करावं तितकं कमी आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतलं त्यांचं योगदान अतुलनीय आहे. ही अशी एक चळवळ होती ज्यात संपूर्ण महाराष्ट्राची एकजूट दिसली, ती पक्षविरहित होती, विचारधारा विरहित होती, या सगळ्या शक्तींना एकत्र ठेवण्याचं काम आजोबांनी केलं. आजोबांचं एक पुस्तक आहे त्यांचं नाव आहे ‘देवांचा धर्म की धर्माची देवळे’… आज आजोबा हयात असते तर धर्माच्या नावाखाली, उत्सवाच्या नावाखाली देवालाच ताब्यात घेण्याचे, त्याला पण आर्थिक महत्वकांक्षेच्या चौकटीत बसवण्याचे जे प्रयत्न सुरु आहेत ते पाहून, धर्माचा बाजार मांडणाऱ्या आणि त्याकडे डोळे मिटून बघणाऱ्या व्यवस्थेवर प्रहार केले असते. असो. पण आम्हा सर्व ठाकरे परिवाराला ओळख , ताकद, आणि विचारांची स्पष्टता मिळाली ती निव्वळ आजोबांमुळेच. आजोबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन !
अशी पोस्ट राज ठाकरेंनी लिहिली आहे. तसंच त्यांनी आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्याबरोबरचा लहानपणीचा फोटोही पोस्ट केला आहे. ही पोस्ट आता चांगलीच चर्चेत आली आहे. आज सकाळीच राज ठाकरेंनी एक व्यंगचित्र काढून भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना आणि पहलगाम हल्ला यावर भाष्य केलं.