देशातल्या जवळपास सगळ्याच चळवळी संपल्यात जमा आहेत. केवळ कामगार आणि शेतकरी चळवळ धग धरून उभी आहे. ही पण चळवळ संपवण्याचा घाट घातला जात आहे. देश खासगीकरणाच्या विळख्यात घालवण्यासाठी या चळवळ संपवण्याचं कारस्थान सुरू आहे, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
समान्यांना आधारवड असणाऱ्या सरकारी कंपन्या एकापाठोपाठ एक विकण्याचा सपाटा सुरू आहे. एअर इंडिया विकली आता कधी ही बीएसएनएलचा नंबर लागू शकतो. ही खुली व्यवस्था मक्तेदारीला चालना देणारी आहे. हे मोडून काढण्याची टाकत फक्त चळवळी मध्ये आहे, त्यामुळे आपसातले मतभेद आणि इझम विसरून देशभरातील सर्व चळवळी एकत्र करूया, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
राज्य तसंच केंद्र सरकारविषयीची नाराजीही काही दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांनी बोलून दाखवली आहे. शेतकऱ्यांविषयीचे प्रश्न हाताळण्यात दोन्ही सरकारं कमी पडत आहेत, असंही ते म्हणाले होते. राज्यातील ३०-३५ साखर कारखान्यांना एकरकमी एफआरपी द्यायला जमतं तर सहकारमंत्र्यांनाच काय अडचण? आणि कायद्याने एकरकमी एफआरपीचा हक्क असताना तो डावलला जात असेलतर तसे करणारे साखर कारखाने का सुरू होऊ द्यावेत असे प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपस्थित केले. ऊसउत्पादकावर अन्याय झाल्यास ऊस गळीत हंगाम जोमात असताना तो बंद पाडू असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे.
शेट्टी म्हणाले की, ज्येष्ठनेते यशवंतराव चव्हाण व पी. डी. पाटील यांचा वारसा सांगत बाळासाहेब पाटील सहकारमंत्री झाले. पण, शेतकऱ्यांना कायद्याने त्यांच्या हक्कांचे संरक्षण मिळवून देण्याऐवजी ते शेतकऱ्यांचे रक्षक नव्हे,तर भक्षकासारखे वागत आहेत. ते सहकारमंत्री आहेत की केवळ सह्याद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत हे समजून येत नसल्याचा टोला शेट्टी यांनी लगावला. केवळ केंद्र सरकारचेच बरोबर आणि इतर सारे अन्यायी म्हणणाऱ्यांशी आमचे व शेतकऱ्यांचेही काही देणेघेणे नसल्याचे ते सदाभाऊ खोत यांना उद्देशून म्हणाले.