रत्नागिरी – चिपळूण तालुक्यातील शिरगाव तळसर हे गाव पुन्हा वाघाच्या डरकाळ्यांनी दणाणून गेले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या शिरगाव-तळसर या गावातील जंगल भागात वाघाच्या डरकाळ्या ऐकू येवू लागल्या आहेत तर त्याच्या पायाच्या पंजाचे ठसे आढळून आले आहेत. यामुळे परिसरात भितिचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत आता वन विभाग देखील सतर्क झाले आहे.

 सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या शिरगाव-तळसर या गावातील जंगल भागात मागील दोन दिवसांपूर्वी या भागात पट्टेरी वाघाची डरकाळी  ऐकू आल्याचे सांगितले जात आहे. तसेच याच परिसर भागात वाघाच्या पंजाचे ठसे आढळून आले आहेत. या सर्व  घटनेनंतर  वनविभागाच्या पथकाने जाग्यावर  जावून या सगळ्याची पहाणी केली.

या सर्व घटनेनंतर वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक राहुल गुंठे व कृष्णा इरमले यांच्या पथकाने लोक वस्तीपासून सहा किलोमीटर अंतरावर जंगलात पाहणी करुन  चार ट्रॅप कॅमेरे बसवले. यावेळी  मिळालेल्या पंजाच्या ठशांचे प्लॅस्टर कास्टींग करण्यात येवून प्रयोगशाळा तपासणीसाठी काही नमुनेही गोळा करण्यात आले आहेत. आढळून आलेल्या पंजाचा आकार सुमारे सतरा सेंटीमीटर असून, प्राथमिक तपासणीत हा नर वाघ असल्याचा अंदाज वनविभागाकडून व्यक्त केला जात आहे.

 तळसर परिसरातील  जंगलात गेल्या वर्षी याच वाघाच्या हालचालींचे संकेत मिळाले होते. त्यावेळी मौशीच्या शिकार करण्याच्या पद्धतीवरून व पंजाच्या आकारावरून वनविभागाने पाच ट्रॅप कॅमेरे बसवले होते. मात्र पुढील काही महिन्यांत कोणतीच हालचाल या कॅमे-यांमधून दिसून आली नव्हती. मात्र यावर्षी जानेवारीतच वाघाच्या  पुन्हा काही पाऊलखुणा दिसून आल्या होत्या.  या परिसरात रानकुत्र्यांवरील संशोधनासाठी पीएच.डी. करीत असलेली संशोधक राणी प्रभुलकर हिने  जंगलात  वाघाच्या डरकाळ्या ऐकल्याचे सांगितले आहे. त्यानंतर तिला वाघाच्या पावलांचे ठसेही दिसून आल्यावर तिने तत्काळ वनविभागाला याची माहिती दिली.

 वनविभागाच्या प्राथमिक तपासणीनंतर, हा वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य जंगल पट्ट्यातून खाद्य व पाण्याच्या शोधात खाली उतरल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील काही दिवसांत ट्रॅप कॅमेऱ्यांमधून मिळणाऱ्या दृश्यांवरून वाघाच्या हालचालींचे अचूक निरीक्षण करण्यात येणार असल्याचे वन विभागाकडून सांगितले जात आहे. मात्र, यापार्श्वभुमिवर  वनविभागाने स्थानिकांना जंगल परिसरात अनावश्यक वावर टाळण्याचे तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित कळविण्याचे आवाहन केले आहे.