जालना : बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशक खरेदीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून जालना जिल्हयात नऊ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्याच प्रमाणे या संदर्भात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक याप्रमाणे आठ तक्रार निवारण केंद्रही सुरू करण्यात येणार आहेत.आगामी खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे, रासायनिक खते आणि किटकनाशकांची मागणी आणि उपलब्धता यासंदर्भात कृषी विभागाने नियोजन केले आहे. अप्रमाणित बियाणे, खते आणि कीटकनाशक विक्रीत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी भरारी पथकांच्या मार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे.
बियाणे, रखते आणि किटकनाशकांचे २०२४ या वर्षात ९३३ नमुने अप्रमाणित आढळले होते. यापैकी २३ प्रकरणात न्यायालयात खटले दाखल करण्यात आले. ३७ प्रकरणांत संबधितांना ताकीद देण्यात आली असून उर्वरित ७३ प्रकरणांतील कायदेशीर कारवाई प्रक्रियेत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना लेखी स्वरुपात दिली आहे.
२२ कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित
कृषी सेवा केंद्रांचे परवाने नूतनीकरण केले नाही म्हणून तसेच अन्य कारणांमुळे २२ कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द करण्यात आले. २०२४ मध्ये बियाण्यांचे ४३ नमुने अप्रमाणित आढळून आले होते. त्यापैकी २८ नमुने खटले दाखल करण्यासाठी पात्र होते. यापैकी २० प्रकरणांत खटले दाखल करण्यात आले असून एका प्रकरणात पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रासायनिक खतांचे ७४ नमुने अप्रमाणित आढळले होते आणि त्यामध्ये ५८ प्रकरणे न्यायालयात खटले दाखल करण्याच्या पात्रतेचे होते. परंतु आतापर्यन्त एकाच प्रकरणात न्यायालयात खटला दाखल करण्यात आलेला असल्याचा अहवालही वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे.