जिल्ह्यात अतिवृष्टी व गारपिटीने शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला. खरीप व रब्बी पिके हातची गेल्याने त्यांच्यासमोर आता चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच हिवरा येथे शेतकऱ्याने कर्जाचा डोंगर झाल्याने स्वतला जाळून घेतले. त्याचा मंगळवारी मृत्यू झाला. या पाश्र्वभूमीवर कर्जाची परतफेड कशी करायची, हे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले असताना विविध बँकांनी ४५३ कोटींचे कर्ज वाटप केले. परंतु त्याच्या वसुलीचे आव्हान बँकांना आता पेलवणार काय, असे चित्रही जिल्ह्यात निर्माण झाले आहे.
कळमनुरी तालुक्यातील हिवरा येथील शेतकरी सोपान भीमा गोडबोले (वय ३६) यांनी कर्ज परतफेडीच्या धसक्याने स्वतला जाळून घेतले. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. गोडबोले यांना तत्काळ नांदेडच्या रुग्णालयात दाखल केले. मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसांत नोंद झाली.
जिल्हा सहकारी बँकेच्या शाखा सुमारे २२ शाखा, शिवाय राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनेंतर्गत पीक कर्ज दिले जाते. ज्या बळीराजाने पूर्वी घेतलेले कर्ज फेडले आहे, त्याला प्राधान्याने कर्ज मिळते. जिल्हा बँकेकडून खरीप हंगामात ५९ हजार १६१ सभासद शेतकऱ्यांना ८१ कोटी ७८ लाख रुपये, तर राष्ट्रीयीकृत बँकांकडून ३६ हजार २९१ सभासदांना २५१ कोटी ४३ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले. ग्रामीण बँकेकडून ९ हजार ३५ शेतकरी सभासदांना ४३ कोटी ३९ लाख कर्जवाटप झाले. खरीप हंगामात बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकरी सभासदांची संख्या १ लाख ४ हजार ४८७ असून त्यांना ३७६ कोटी ६० लाख कर्जवाटप करण्यात आले.
जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीने १ लाख ५ हजार हेक्टरहून अधिक जमिनीवरील खरीप पिकांना फटका बसल्याने शेतकरी अडचणीत सापडला. या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुमारे ५३ कोटींचा निधी मंजूर केला. हा निधी बळीराजाच्या हातात पडतो न पडतो, तोच हातातोंडाशी आलेल्या रब्बी पिकांवर गारांचा मारा झाल्याने पीक मातीत गेले. पण रब्बी पिकांसाठी घेतलेल्या कर्जाची फेड करण्याची आशाही मावळली. रब्बी हंगामात १८ हजार ३७७ शेतकरी सभासदांना जिल्हा बँकेने २९ कोटी २६ लाख, राष्ट्रीयीकृत बँकेने ३ हजार २५४ शेतकरी सभासदांना ४२ कोटी ७० लाख व ग्रामीण बँकेने ८३६ लाभार्थी शेतकऱ्यांना ४ कोटी ७६ लाख असे रब्बी हंगामात २२ हजार ४६७ सभासद शेतकऱ्यांना ७६ कोटी ७२ लाखांचे कर्जवाटप झाले.
खरीप हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा घात केला. रब्बी हंगामात मात्र पिकांच्या कर्जाची परतफेड करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गारांचा मारा झाल्याने हिरावून घेतला. शेतकऱ्यांना वाटप केलेल्या ४५३ कोटींच्या पीककर्जाची वसुली कशी करावी, या चिंतेत बँक अधिकारी असल्याचे चित्र आहे. अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला सरकारने लवकर मदतीचा हात द्यावा, नसता कर्जफेडीच्या नावाखाली शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय नाही, अशीही स्थिती आता निर्माण झाली आहे.