पंढरपूर : रामराजे निंबाळकर यांना उतारवयात प्रेम झाले आहे. प्रेम करायचे वय असते. सभापती म्हणून सत्तेत असताना आयुष्यभर लोकांना त्रास दिला. सत्तेचा गैरवापर केला. जनतेचा विश्वास गमावल्याने असुरक्षितता निर्माण झाली; त्यातूनच रामराजे निंबाळकर यांना आमच्याविषयी प्रेमाची, मनोमिलनाची भाषा सुचत असल्याची टीका ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी येथे केली आहे.

ग्रामविकासमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री गोरे येथील श्री विठ्ठल मंदिर समितीने आयोजित केलेल्या श्री ज्ञानेश्वरी चिंतन राज्यस्तरीय संमेलनाला आले होते. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रामराजे निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व इतर नेत्यांच्या मनोमिलनाची साताऱ्यात चर्चा सुरू आहेत. याबाबत त्यांनी नुकतीच जाहीरपणे तडजोडीची भूमिका मांडली. शिवाय जयकुमार गोरे यांच्याबाबतचा विरोधही बाजूला ठेवत एकत्र येण्याबद्दल मतप्रदर्शन केले आहे. या पार्श्वभूमीवर गोरे बोलत होते.

गोरे म्हणाले, की सत्ता असताना गेली अनेक वर्षे त्रास देऊन झाला. आता सत्तेच्या वर्तुळातून बाहेर पडल्यावर सामोपचाराची भाषा आठवत आहे. यामागे आपली गैरकृत्य लपवणे, राजकीय सुरक्षितता शोधणे हे कारण आहे. यांच्या राजकारणामुळेच रणजितसिंह निंबाळकर यांना लोकसभेला पराभूत व्हावे लागले. पुढे विधानसभेलाही यांनी महायुतीविरोधात राजकारण केले. या अशा पार्श्वभूमीवर आता आपले राजकारण चालेनासे झाले.

राजकारणात आपले, आपल्या गटाचे अस्तित्व टिकवण्यासाठी, आजवर केलेली गैरकृत्ये लपवण्यासाठी रामराजेंनी ही मनोमिलनाची भाषा सुरू केली आहे. आजवर एवढा त्रास दिल्यावर पुन्हा टाळी आणि फूल देत हात पुढे करायाचा. याला मनोमिलन नाही, तर स्वार्थी राजकारण म्हणतात. आम्ही टाळीही देत नाही आणि फूलही. आम्ही लोकांमध्ये जाऊन काम करतो. जनतेसोबत कायम राहतो. केवळ निवडणुका आल्यावर बाहेर पडत नाही. यांनी आयुष्यभर जनतेची कामे करण्याऐवजी त्रास देणे, राजकारण करण्याचेच काम केले. आता सर्व बाजूंनी अडचणीत आल्यावर यांना प्रेम सुचत आहे. रामराजे यांना उतारवयात प्रेम झाले आहे. त्यामागील संधिसाधूपणा जनतेला बरोबर कळतो, अशी टीका गोरे यांनी रामराजे यांच्यावर केली.

पूरस्थितीत प्रशासनाचे चांगले काम

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात पूरस्थिती आणि पूर ओसरल्यावर प्रशासनाने चांगले काम केल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री गोरे यांनी काढले. पूर ओसरल्यावर द्यावयाची तातडीची मदत, स्वच्छता, जनावरांना चारा आदी सुविधा नियोजनपूर्वक प्रशासनाने दिल्या आहेत. सध्या पूरग्रस्त गावांत स्वच्छतेसाठी जिल्हा परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, तसेच इतर सेवाभावी संस्था काम करत आहेत. त्याच बरोबरीने प्रत्येक गावात आरोग्य शिबिरे घेऊन नागरिकांची तपासणी करत आहेत, असेही गोरे यांनी सांगितले.