मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी सकाळी एसटी महामंडळाची बस अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी अहमदनगरमध्ये पेटवली. राज्याचे गृहमंत्रीपद सांभाळणाऱया आर. आर. पाटील यांच्याच पक्षाच्या युवा शाखेचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांच्याच नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, बस जळून खाक झाली असून, तिचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी २५ जणांना अटक केली आहे.
मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शहरातील जीपीओ चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मराठा सेवा संघाचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रशांत गोपाळ कलापुरे, संघटक कृषिराज रुपचंद टकले आणि काळे यांच्या नेतृ्त्त्वाखाली हे आंदोलन सुरू होते. सुमारे ५० ते ६० कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. रास्तारोकोमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्याचवेळी या चौकाच्या जवळच असलेल्या विक्रीकर भवनापाशी एसटी बस उभी होती. ही बस जिल्ह्यातील आगडगावला निघाली होती. सकाळी साडेअकराच्या सुमारास मराठा सेवा संघाचे सात ते आठ कार्यकर्ते या बसमध्ये शिरले. त्यांनी बसमधील प्रवाशांना आणि वाहक-चालकाला खाली उतरण्यास सांगितले. आंदोलकांच्या हातात पेट्रोलच्या लहान बाटल्या होत्या. काही कार्यकर्ते टपावरही चढले होते. या सर्वांनी एसटीवर पेट्रोल ओतले आणि नंतर ती पेटवून दिली. याप्रकरणी नगर शहरातील कॅम्प पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.