सांगली : सांगलीतील प्रसिद्ध उद्योजक, व्यावसायिक तथा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील उपक्रमशील कार्यकर्ते अरुण रंगनाथ दांडेकर (वय ७५) यांचे गुरुवारी सकाळी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे, बंधू असा मोठा परिवार आहे.

दांडेकर यांचे मूळ गाव बिळाशी (ता. शिराळा) हे होते. त्यांचे वडील स्वातंत्र्य चळवळीत प्रसिद्ध असलेल्या बिळाशीच्या बंडात सहभागी होते. त्यांच्या पश्चात सांगलीत येऊन त्यांनी सचोटीने किराणा व्यवसाय सुरू केला. एका छोट्या दुकानातून सुरू केलेला हा व्यवसाय पुढे दांडेकर मॉलपर्यंत त्यांनी हा व्यवसाय वाढवला. शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांची उभारणी, विकासात त्यांनी योगदान दिले. ४० हून अधिक विविध सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता.

ब्राह्मण नागरी पतसंस्थेची त्यांनी स्थापना केली. तसेच चेंबर ऑॅफ कॉमर्समध्येही ते सक्रिय होते. सांगलीत रोटरी क्लबच्या उभारणीत आणि या माध्यमातून सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार होता. तसेच यंग मेन्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले.

गुढी पाडव्यादिवशी लोकांना चांगले संगीत ऐकण्यास मिळावे यासाठी त्यांनी २७ वर्षांपूर्वी ‘सूर पहाटेचे’ हा सांगीतिक कार्यक्रम सुरू करून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. तसेच ‘ॲक्टिव्ह ग्रुप’च्या माध्यमातून नाट्य क्षेत्रातही योगदान दिले. विश्वजागृती मंडळाच्या वतीने त्यांनी ‘सांगलीभूषण पुरस्कार’ सुरू केला. त्या माध्यमातून सांगली जिल्ह्याचे नाव मोठे करण्यात ज्यांनी योगदान दिले, अशांचा सन्मान करण्यात पुढाकार घेतला.

मृत्यूपश्चात त्यांनी नेत्रदान व त्वचादानाचा संकल्प केला होता. दुपारी अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी शहरातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.