सांगली : सांगली प्रारूप अंतर्गत पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या उत्पादक-खरेदीदार संमेलनामध्ये १४ कोटींचे १५८० टन शेतमाल खरेदी-विक्रीचे करार करण्यात आले. जिल्हाधिकारी अशोक काकडे व कृषी विभागाच्या वतीने आयोजित संमेलनात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतमालावर प्रक्रिया करण्याची गरज प्रतिपादन केली.

या संमेलनासाठी कृषी आयुक्त सूरज मांढरे व अपेडाचे संचालक डॉ. परशुराम पाटील हे दूरदृश्यप्रणालीद्वारे, तर प्रत्यक्षात जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पणन संचालक विकास रसाळ, अपेडाचे प्रादेशिक प्रमुख प्रशांत वाघमारे, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, कृषी उपसंचालक धनाजी पाटील, सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांनी या संमेलनात स्टॉल लावले होते. ४५ निर्यातदार व खरेदीदारांनी संमेलनात व १४५ शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष संवादात सहभाग नोंदवला. जवळपास दीड हजारच्या आसपास शेतकरी उपस्थित होते.

या वेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, ‘उत्पादक खरेदीदार संमेलनातून शेतकरी, व्यापारी व निर्यातदार यांना थेट संवादाची संधी उपलब्ध होत आहे. शेतमाल निर्यात क्षेत्रात शेतकरी महिलांनाही प्रोत्साहन द्यावे. अशा संधी उपलब्ध होण्यासाठी अपेडाने पुढाकार घेऊन त्यांना मार्गदर्शन करावे, असे त्यांनी या वेळी सूचित केले.

जिल्हाधिकारी श्री. काकडे म्हणाले, ‘शेती सांगलीची शान असून, इथल्या द्राक्ष, डाळिंब, केळी, ड्रॅगन फ्रूट आदींना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्याचा लाभ होऊन इथल्या शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल, या हेतूने हे संमेलन आयोजित केले आहे. या उत्पादक खरेदीदार कृषी संमेलनातून केवळ एकच दिवस नव्हे, तर नियमित सकारात्मक संवाद व्हावा. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव राहील.’

जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांनी या संमेलनात स्टॉल लावले होते. ४५ निर्यातदार व खरेदीदारांनी संमेलनात व १४५ शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष संवादात सहभाग नोंदवला. जवळपास दीड हजारच्या आसपास शेतकरी उपस्थित होते. या संमेलनात बेदाणा, हळद, परदेशी भाजीपाला, द्राक्षे, डाळिंब, पेरू, सीताफळ, बाजरी, मटकी व इतर तृणधान्य, प्रक्रिया केलेली उत्पादने यांच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.