रत्नागिरी – संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे असलेल्या चंद्रकांत गणू बांबाडे यांच्या मालकीच्या काजू सोलण्याच्या कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत मशनरी साहित्य व काजू बी जळून खाक झाले. शनिवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे सुमारे ७३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या कारखान्याच्या इमारतीतून अचानक धुराचे लोळ बाहेर पडून काही वेळातच आगीचा भडका उडाला. यावेळी ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना यश आले नाही. यावेळी देवरुख नगर पंचायत कडून आलेल्या अग्निशमन बंबाने आग आटोक्यात आणण्यात ब-याच वेळाने यश आले.

कारखान्याला लागलेल्या आगीमध्ये चंद्रकांत बांबाडे यांचे सुमारे ७३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र आग लागल्याचे कारण स्पष्ट झाले नसून, या आगीत स्टीम कुकर, काजू ड्रायर मशीन, ऑटोमॅटिक काजू कटर मशीन, पोलिंग मशीन, कोम्प्रेसर हॅन्ड कटर,ग्रॅण्डिंग मशीन, मॉश्वर ड्रायर तसेच तीन टन मिक्स काजू गर व सुमारे सात टन रॉ मटेरियल तसेच इमारतीचे नुकसान झाल्याची माहिती ग्राम महसूल अधिकारी श्री. घोलप यांनी दिली. यात एकूण ७२ लाख ५१२६७ रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचयादीत नमूद करण्यात आले आहे.