अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नोटीस बजावणार असल्याचे सांगितल्यानंतरही पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या भूमिकेचे रविवारी नगरमध्ये झालेल्या सभेत जाहीररीत्या समर्थनच केले. त्याचाच अप्रत्यक्ष संदर्भ देत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी संग्राम जगताप यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
शहरातील उड्डाणपुलावरून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह पत्रके भिरकावण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी शहरात आज, रविवारी ‘शिवशक्ती-भीमशक्तीचा जनआक्रोश मोर्चा’ आयोजित करण्यात आला होता. मोर्चानंतर झालेल्या सभेत आमदार जगताप व आमदार पडळकर बोलत होते.
तत्पूर्वी आमदार जगताप यांनी पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात भूमिका घेत, दिवाळीला केवळ एका ठरावीक समाजाच्या व्यावसायिकांकडेच खरेदी करा, असे आवाहन केले होते. जगताप यांची ही भूमिका पक्षाची नसल्याचे सांगत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले होते. त्यावर जगताप यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. मात्र त्यांचे समर्थक आजच्या सभेत ते भूमिका मांडतील, असे सांगत होते. त्यामुळे जगताप यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. जगताप यांनी अजित पवार यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत आपल्या भूमिकेचे समर्थन केले.
सभेत बोलताना आमदार जगताप म्हणाले, ‘खरेदी’ प्रकरणात आपण प्रथम सुरुवात केलेली नाही. दरवर्षी एकाच ठरावीक समाजाकडून खरेदी करण्याबाबत आव्हानात्मक मजकूर असलेली पत्रके वाटली जातात. हा प्रकार थांबायला तयार नव्हता. असा धार्मिक वाद करू नका म्हणून आपण त्यांना समजावून सांगितले. परंतु त्यात बदल झाला नाही. त्यानंतरच आपण भूमिका घेतली. महापालिकेच्या सभागृहात संविधानाला मानणारे, राष्ट्रगीत म्हणणारे सदस्य हवेत. आता यापुढे असे काही घडले तर आधी प्रत्युत्तर दिले जाईल, मग मोर्चा काढला जाईल. पुन्हा संविधानाचा, आंबेडकरांचा अवमान झाला तर त्यांना धडा शिकवला जाईल, असा इशाराही संग्राम जगताप यांनी दिला.