शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईडीची खिल्ली उडवणारं एक व्यंगचित्र ट्विट केलं आहे. सध्या माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम असोत, राज ठाकरे असोत किंवा शरद पवार त्यांच्यामागे ईडीने चौकशीचं शुक्लकाष्ठ लावलं आहे. शरद पवार यांच्यावर शिखर बँक प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल केल्यावर ते स्वतःच ईडी कार्यालयात हजर राहणार होते. त्यासाठी त्यांनी शुक्रवारी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ईडीने तुम्ही आत्ता येऊ नका गरज असेल तेव्हा आम्ही तुम्हाला बोलवू असं सांगितलं. ज्यानंतर शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाणं तहकूब केलं. हे जरी शुक्रवारीच घडलं असलं तरीही ईडी सध्या चर्चेत आहे. त्याच अनुषंगाने एक व्यंगचित्र ट्विट करत अच्छा है म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईडीची खिल्ली उडवली आहे.

या व्यंगचित्रात एक नेता ज्योतिषाला भविष्य पाहण्यासाठी हात दाखवतोय. तेव्हा ज्योतिषी त्याला सांगतो की तुम्हाला शनिपेक्षा डेंजर ईडी पिडा सुरु होण्याची चिन्हं आहेत. त्यावर उपाय म्हणजे कमळाचं फूल जवळ ठेवा. ईडीचं नाव ऐकताच व्यंगचित्रातला नेता खूप घाबरलेला दाखवण्यात आला आहे. संजय राऊत यांनी हे व्यंगचित्र पोस्ट करुन ईडीची खिल्ली उडवली आहे आणि भाजपावरही निशाणा साधला आहे.