सातारा: श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा १११ वा पुण्यतिथी महोत्सव समाधी मंदिर परिसरात उत्साहात सुरू आहे. यानिमित्ताने ‘श्रीं’ची पालखी मिरवणूक दररोज सकाळी काढण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोंदवले (ता. माण) येथील समाधी मंदिरात सकाळी भाविकांची पालखी मिरवणुकीच्या तयारीची लगबग सुरू होती. चांदीच्या पालखीला पुष्पमालांनी सजविण्यात आले आहे. सकाळी नऊच्या सुमारास मंदिरात ‘श्रीं’च्या समाधी व पादुकांचे विश्वस्तांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर आरती होताच श्रीराम नामाच्या गजरात मानकऱ्यांच्या हस्ते पादुका व प्रतिमा चांदीच्या पालखीत विराजमान करण्यात आल्या. यावेळी सारा मंदिर परिसर चैतन्यमय झाला होता.

हेही वाचा – Devendra Fadnavis : परभणीच्या घटनेत काय घडलं? आरोपी मनोरुग्ण होता का? फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम, सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला मदत जाहीर

चोपदारांनी ‘श्री अनंत कोटी ब्रह्मांडनायक…’ची आरोळी देताच पालखी समाधी मंदिरातून बाहेर निघाली. पाटकऱ्यांनी पालखी वाहकांच्या पायांवर व पाटांवर पाण्याने स्नान घातले. त्यानंतर मोठ्या उत्साहात ही मिरवणूक ग्रामप्रदक्षिणेसाठी निघाली. पालखीसमोर अश्व आणि पताकाधारी भाविक तल्लीन होऊन नाचत होते, तर टाळकरी भजनात दंग झाले होते. श्रीराम नामाच्या जयघोषात समाधी मंदिरातून निघालेली पालखी मिरवणूक सातारा-पंढरपूर रस्त्यावरून हळूहळू पुढे सरकत होती. गावातील सर्वच मंदिरांत आरती करून पालखी सोहळा पुढे जात होता. ग्रामप्रदक्षिणेनंतर पुन्हा हा पालखी सोहळा समाधी मंदिरात आला. त्यावेळी सुवासिनींनी पालखीतील श्रींच्या पादुका व प्रतिमेचे औक्षण केले. श्रीरामाच्या जयघोषात पुन्हा पालखी मुख्य मंदिरात विसावली आणि श्रींच्या पादुका पुन्हा समाधी मंदिरात स्थानापन्न झाल्या. त्याच वेळी भाविकांनी समाधी मंदिराला तेरा प्रदक्षिणा पूर्ण केल्या. श्रींना नैवेद्य दाखवल्यानंतर भाविकांना प्रसाद देण्यात आला. ‘श्रीं’च्या पुण्यतिथी महोत्सवादरम्यान रोज सकाळी ही पालखी मिरवणूक काढण्यात येत आहे.

हेही वाचा – Kalyan Society Scuffle : “हे पार्सल जिथून आलं तिथे पाठवावं”; कल्याण मारहाण प्रकरणी आदित्य ठाकरेंची फडणवीसांकडे मागणी

श्रींच्या प्रतिकृती!

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा चिंचवड येथील श्रीभक्त कलाकार प्रशांत कुलकर्णी यांनी यावेळी सुपारीच्या झाडाच्या फांद्यांच्या वापरातून श्री गोंदवलेकर महाराजांची प्रतिमा साकारली आहे. कुलकर्णी यांनी यापूर्वी देखील विविध रंगांच्या कापडांचा वापर करून, मक्याच्या वापरातून, श्रीराम नामाच्या अक्षरातून, गुळाच्या वापरातून श्रींच्या प्रतिकृती साकारल्या होत्या. याशिवाय जप माळेतील मण्यांच्या वापरातून श्री महाराज, श्री हनुमान व श्री रामदासस्वामी यांची त्रिमिती प्रतिकृती आजही मुख्य सभामंडपात पाहायला मिळतात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satara gondavalekar maharaj punyatithi mahotsav starts in gondavale ssb