Satara News Prasad Kale Indian Army : पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही अण्वस्त्रसज्ज देशांमध्ये संघर्ष निर्माण झाला. पहलगामविरोधात चोख प्रत्युत्तर देण्याकरता देशात ऑपरेशन सिंदूरची रणनीती आखली जात होती. याकरता सीमेवर जवानांची कमतरता राहू नये याकरता सुट्टीवर गेलेल्या सर्व जवानांना पुन्हा कर्तव्यावर बोलावण्यात आलं. यामध्ये अनेकजण आपल्या लग्नाचे विधी अर्धवट सोडून देशसेवेसाठी रुजू झाले आहेत. साताऱ्यातील खटाव तालुक्यातील काळेवाडी गावचा जवान प्रसाद काळे यांनाही ओल्या अंगानेच सीमेवर जावं लागलं आहे. यासंदर्भात त्यांच्या पत्नी वैष्णवी यांनी अत्यंत भावूक पण प्रत्येक महिलेला अभिमान वाटेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसाद काळे यांचा १ मे रोजी वैष्णवी यांच्याशी विवाह झाला. ते लग्नानिमित्त ४० दिवसांची सुट्टी घेऊन घरी परतले होते. पण सीमेवरील तणाव वाढत गेल्याने त्यांना पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे लग्नाची पूजा उरकून ओल्या अंगानेच ते सीमेवर परतले आहेत. आमर्ड रेजिमेंट अमृतसर युनिटमध्ये ते तातडीने हजर झाले.
देशसेवेला त्यांनी प्राधान्य द्यावं
यासंदर्भात त्यांची पत्नी वैष्णवी म्हणाल्या, त्यांना ४० दिवसांची सुट्टी मिळाली होती. ४० दिवसांत व्यवस्थित सर्व प्लान करता येईल, असं वाटत होतं. पण लग्नाची पूजा सुरू असतानाच अचानक कॉल आला. त्यामुळे त्याना तातडीने दुसऱ्या दिवशी जावं लागलं. ” त्या पुढे म्हणाल्या, “मी स्वतःला नशिबवान समजते की मला लष्करातील पती लाभला आहे. देशसेवा करण्याकरता त्यांनी प्राधान्य द्यावं.” त्या टीव्ही ९ मराठीशी बोलत होत्या.
संपर्क होत नाही, मनात चिंता
प्रसाद काळे यांचे वडील म्हणाले, “मनात चिंता आहे, तिथे काय परिस्थिती आहे माहीत नाही. त्यांच्याशी संपर्क होत नाही. ते कोणत्या परिस्थितीत आहे काही कळत नाही. पण त्यांना कॉल आल्यावर देशसेवा पहिली कर, नंतर कुटुंबाकडे लक्ष दे असा धीर दिला. आम्हीच खचून गेलो तर तोही तिथे गेला नसता. त्यामुळे आम्ही त्याला आनंदाने तिथे पाठवलं.”