सातारा : जोरदार पाऊस, महामार्गावर अनेक ठिकाणी जमा झालेले पाणी आणि खड्ड्यांमुळे पुणे बंगळुरू महामार्गावर सातारा जिल्ह्याच्या हद्दीत शनिवारी वाहतूक कोंडी पाहण्यास मिळाली. सातारा जिल्ह्यासह परिसरात गेल्या आठ दिवसांपासून मोठा पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे पुणे बंगळुरू महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी जमा झाले आहे. सेवा रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तसेच या पावसामुळे मार्गावर अनेक ठिकाणी खड्डेही पडले आहेत. यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

सातारा शहराजवळ शेंद्रे नागठाणे, अतितपासून कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या तब्बल तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या होत्या. खंबाटकी घाटातही वाहतूक कोंडी दिसत होती. अनेक ठिकाणी सेवा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे मुख्य मार्गावरील गर्दीत भर पडत कोंडी तयार झाली होती. मार्गावर अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने चालवताना चालकांना कसरत करावी लागत होती. या साऱ्यामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी शनिवारी वाहतूक कोंडीचे चित्र दिसत होते.

शेंद्रे ते कागल या १३२ किलोमीटर अंतरातील रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. हे काम संथ गतीने सुरू असून अनेक ठिकाणी बाह्यवळण आहेत. यातच गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने या रस्त्यांवर सर्वत्र चिखल झाला आहे. तसेच महामार्गावर ठिकठिकाणी खड्डेही पडले आहेत. बाह्यवळण (डायव्हर्शन) व त्यात खड्डे चुकवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे बोरगाव, नागठाणे, उंब्रज, मसूर भागात वाहतूक संथगतीने सुरू होती. पावसामुळे वाहतुकीमध्ये अडथळे असतानाच अनेक वाहने बंद पडल्याने या कोंडीत भर पडत होती. खंबाटकी घाटात दत्त मंदिराजवळ मोठ्या वळणावर इंधन संपल्याने ट्रक रस्त्याच्या मध्येच बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली. रस्त्यातून वाहन बाजूला करण्यास वेळ लागल्याने घाटात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.