अहिल्यानगर: सरकारी शाळा वाचवा व मोफत शिक्षण द्या, या प्रमुख मागणीसाठी ‘मोफत शिक्षण न्याय व हक्क परिषद अभियान’ या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थी, पालक, सामाजिक संस्था व कार्यकर्ते यांच्या सहभागातून फेरीचे आयोजन नगर शहरात करण्यात आले होते.

शहराच्या माळीवाडा भागातील छत्रपती शिवाजी महाराज व बाजार समिती चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन व पुष्पहार अर्पण करत शहरातील प्रमुख रस्त्याने निघालेली ही फेरी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आली. तेथे शिष्टमंडळामार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. विद्यार्थी व पालकांनी सरकारी शाळा वाचवा असे फलक हाती घेतले होते. तसेच आम्हांला मोफत शिक्षण द्या, शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या मालकीचं अश्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

निवेदनात शिक्षणातील खाजगीकरण रोखा, लहान शाळा बंद करण्याचे धोरण थांबवा, वाड्यावस्त्यांवरील १०–२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा कायम ठेवा, अंगणवाडीपासून उच्च व्यावसायिक शिक्षणापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण करा, खाजगी शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शुल्क शासनाने भरणे, राज्य सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मुलांना सरकारी शाळांमध्ये सक्तीने शिक्षण घेणे बंधनकारक करावे, आमदार-खासदार निधीतून शाळा दुरुस्ती व देखभाल करा, शिक्षण विभागातील सर्व रिक्त पदे तातडीने भरणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा दर्जा घसरल्याची विविध कारणे व वास्तव याचे विवेचनही निवेदन करण्यात आले आहे.

शाळा वाचवा रॅलीचे मुख्य संयोजक सुदाम लगड यांनी यावेळी बोलताना सांगितले की, शासकीय व अशासकीय आश्रमशाळांमध्ये पायाभूत सुविधा नाहीत, शिक्षकांची कमतरता आहे, व्यवस्थापनातील त्रुटी, शैक्षणिक दर्जा खालावणे, विद्यार्थी समस्या, समाज व पालकांचा कमी सहभाग आणि यंत्रणेत समन्वयाचा अभाव या गंभीर मुद्द्यांवर शासनाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. शिक्षण सर्वांसाठी समान आणि मोफत व्हावे, हा आमचा ठाम आग्रह आहे.

आंदोलनात रावसाहेब क्षेत्रे, प्रवीण सोनवणे, संदिप सकट, सुनिल ढोले, विजय भारस्कर, योगेश साबळे, लक्ष्मण शिंदे, जालू शेलार, राहूल ठोकळ, रुपेश जगधने, जालिंदर निकम, कृष्णा लोहकरे, सकट, अलिशा गर्जे, अनंत द्रविड, ॲड. जितेंद्र आढाव, प्रा. श्याम शिंदे, प्रा. बापू चंदनशिवे आदींसह शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते तसेच शालेय विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते.