यंदा दुष्काळाचे सावट असताना ग्रामीण भागात गणेशोत्सवात उत्साह नसला तरी शहरी भागात उत्साह कायम आहे. सांगलीतील बहुतांशी मंडळाचे देखावे पाहण्यासाठी खुले झाले असून, मिरजेतील काहींचे देखावे खुले झाले आहेत. तर काही मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. जि’ाात यंदा सार्वजनिक मंडळांची संख्या साडेचार हजारांवर पोहोचली असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षातून मिळाली. यापकी १०४४ मंडळे महापालिका क्षेत्रातील आहेत.
सुटीची पर्वणी साधत गणेश मंडळांचे देखावे पाहण्यास सांगलीचे रस्ते रात्री उशिरापर्यंत गर्दीने फुलून गेले होते. सोमवारी गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर गणेशभक्तांची संख्या वाढणार आहे. चालू वर्षी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सांगली शहर, विश्रामबाग, संजयनगर, मिरज शहर, कुपवाड औद्योगिक वसाहत आणि गांधी चौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १०४४ सार्वजनिक मंडळांनी श्रींची स्थापना केली आहे. तर जि’ााच्या ग्रामीण भागात ३ हजार ५०० मंडळांनी सार्वजनिक गणेशमूर्तीची स्थापना केली असल्याची माहिती नियंत्रण कक्षातून सोमवारी देण्यात आली.
पौराणिक, सामाजिक या विषयाबरोबरच राजकीय विषयांनाही यंदाच्या देखाव्यात मंडळांनी स्थान दिले आहे. वैशिष्टय़पूर्ण मंगलमूर्ती हेही वेगळेपण यंदा काही मंडळांनी जपले आहे. मात्र पौराणिक देखाव्यावर जास्त भर दिसून येत आहे. वखार भाग व्यापारी मंडळाने संत गोरा कुंभारचा देखावा सादर केला आहे, तर गावभागातील रणझुंजार मंडळाच्या देखाव्यात नरहरी सोनार आहेत. वखार भागात अष्टविनायकने गोव्यातील मंगेशी मंदिराची प्रतिकृती सादर केली आहे. दीनानाथ मंडळाने गंगा अवतरणचा देखावा उभारला आहे. शिलंगण चौकात जय मल्हार मालिकेचा प्रभाव दिसून येत असून, या ठिकाणी मल्हारी बानू विवाह सोहळा सादर केला आहे. महापालिका सेवक संघाने लेक वाचवाचा संदेश दिला असून, हिराबागच्या देखाव्यात माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना स्थान देण्यात आले आहे.
यंदा मोटार मालक संघ, कापडपेठ, लक्ष्मीनारायण, पटेल चौक, सावकार आदी मंडळांनी पौराणिक विषय हाताळले आहेत. याशिवाय काही मंडळांनी विज्ञाननिष्ठ देखावे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पर्यावरणाचे विषयही काही ठिकाणी सादर करण्यात आले असून, यापकी वखारभागातील सायकलरिक्षातील गणेशाची स्वारी लक्षवेधी ठरली आहे.
मिरजेतील सार्वजनिक मंडळांनी यंदाही हलत्या देखाव्यापेक्षा सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे प्रसंग जिवंत देखाव्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये समाजातील मुलींचे घटते प्रमाण, पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास, दुष्काळ आदीसह काही सामाजिक समस्या मांडण्यासाठी गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला आहे. उदगाव वेस, पाटील गल्ली, बुधवार पेठ, कुरणे गल्ली, नदीवेस आदी ठिकाणी हे जिवंत देखावे सादर केले जात असले तरी अद्याप देखावे तयार झालेले नाहीत, मंगळवारपासून हे देखावे सादर होणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Sep 2015 रोजी प्रकाशित
सांगलीत देखावे पाहण्यासाठी खुले
यंदा दुष्काळाचे सावट असताना ग्रामीण भागात गणेशोत्सवात उत्साह नसला तरी शहरी भागात उत्साह कायम आहे.
Written by अपर्णा देगावकर

First published on: 23-09-2015 at 03:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scenes of ganesh festivals open in sangli