धाराशिव : दैवी चमत्काराचे दावे करणाऱ्या स्वंयघोषित राष्ट्रसंत लोमटे महाराजाला महिलेवर केलेल्या अत्याचार प्रकरणी येरमाळा पोलिसांनी अटक केली आहे. पंढरपूर येथे सापळा लावून मोठ्या शिताफीने पोलिसांनी लोमटे महाराजाला गजाआड केले आहे. न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दर्शनासाठी आलेल्या महिलेस खोलीमध्ये बोलावून किळसवाणे कृत्य करून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी लोमटे महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी सापळा रचून लोमटे महाराजाला पंढरपूरमधून अटक केली आहे.

हेही वाचा – शरद पवार तुमच्याबरोबर येणार? हसन मुश्रीफ म्हणाले, “आम्ही त्यांना…”

दैवी चमत्कारामुळे राज्यभर प्रसिद्ध असणारा कळंब तालुक्यातील मलकापूर येथील एकनाथ लोमटे विरोधात २८ जुलै २०२२ रोजी पीडित भक्त महिलेने दिलेल्या तक्रारीवरून येरमाळा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परळी येथील ३५ वर्षीय पीडित महिला मलकापूर येथील स्वयंघोषित राष्ट्रसंत लोमटे महाराज यांच्या दर्शनासाठी मठातील दक्षिण मंडपात गेली होती. 

महाराजाने महिलेस प्रवचन खोलीमध्ये बोलून घेत महिलेचा विनयभंग केला होता. या घटनेने मंदिर परिसरामध्ये प्रचंड गोंधळ मजला होता. या प्रकारानंतर महाराजाने घटनास्थळावरून पळ काढला. त्याच रात्री एक वाजेच्या सुमारास महिलेच्या तक्रारीवरून महाराजावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला, त्यानंतर महाराजाला अटकही झाली होती. नंतर जामीनवर सुटका झाली.

पीडित भाविक महिलेने अत्याचार प्रकरणी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशाने पीडित मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार लोमटे महाराजाला अटक केली गेली आहे.

हेही वाचा – “मी काँग्रेस हायकंमाडच्या संपर्कात, पण महाराष्ट्रातील…”, सुप्रिया सुळेंचं विधान

विविध पक्षांचे बडे नेते महाराजांचे भक्त

कळंब तालुक्यातील मलकापूर येथे लोमटे महाराज यांचा मठ आहे. आपल्या दैवी शक्तीने महाराज आजारी व्यक्ती आणि भक्ताला बरे करतात अशी महाराजांची ख्याती आहे. महाराजांचा राज्यभर मोठा भक्तवर्ग असून यामध्ये विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. भक्त महिलेच्या विनयभंग प्रकरणात लोमटे महाराजाला अटक झाल्याने धार्मिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या स्वयंघोषित महाराजाने आणखी किती महिला भक्तांची फसवणूक केली हे तपासात उघड होईल असे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी या महाराजावर जादूटोणा आणि लोकांना फसवल्या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Self proclaimed national saint lomte maharaj arrested in case of women abuse ssb