“मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं”, हे देवेंद्र फडणवीसांचं विधान सध्या राज्यभरात चांगलंच चर्चेत आहे. अनेकांनी त्यांच्या या विधानाची खिल्ली उडवली, तर काहींनी त्यांना खोचक टोमणेही मारले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही फडणवीसांच्या त्या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांचं मी सर्वात आधी अभिनंदन करतो, असं म्हणतच त्यांनी आपल्या शेलक्या शब्दांच्या माऱ्याला सुरूवात केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकारपरिषदेत बोलताना पवार यांनी फडणवीसांना चांगलाच टोला लगावला आहे. ते म्हणाले, “पाच वर्ष सत्तेत असल्याचं स्मरण राहणं हे कधीही चांगलं. वेदना किती खोल आहे हे यातून दिसतं, पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर आपण सत्तेत आहोत याचं स्मरण ठेवणं ही चांगली गोष्ट आहे. मी चार वर्ष मी मुख्यमंत्री होतो पण माझ्या लक्षात कधी राहिलंही नाही. ही आमची कमतरता आहे हे मी कबूल करतो. सत्ता गेल्याची वेदना किती सखोल आहे हे यातून दिसून येतं”. सत्ता येते जाते याचा फारसा विचार करायचा नसतो, असा सल्लाही पवार यांनी फडणवीसांना दिला आहे.

हेही वाचा – मला आजही वाटते मी मुख्यमंत्री आहे – देवेंद्र फडणवीस

काय म्हणाले संजय राऊत?

आता या विधानावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही टोला लगावण्याची संधी सोडली नाही. “अजूनी यौवनात मी असं अनेकांना वाटतं. हे नाटक रंगमंचावर फार गाजलं. तसं अनेकांना वाटतं की अजूनी यौवनात मी. मी अजूनही मुख्यमंत्री… आम्हालाही दिल्लीत गेल्यावर कधी कधी वाटतं आमचा पंतप्रधान होणार. त्यांची भावना योग्य आहे. स्वप्नात रममाण व्हावं माणसाने, चांगली स्वप्ने पाहावीत. स्वप्नांना बळ असावं, त्यांच्या पंखांना ताकद यावी. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांचं आयुष्य स्वप्न बघण्यात जावं, अशा शब्दात संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar on devendra fadnavis statement i m still feeling like cm vsk