राहाता : दिल्ली येथील साईभक्ताची शिर्डीत चार मजली इमारतीच्या खरेदी व्यवहारात ५१ लाखांची फसवणूक करणाऱ्या जागामालकाविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शिर्डी परिसरात राहणाऱ्या कुमावत यांना त्यांची चार मजली इमारत विक्री करायची असल्याची माहिती त्यांनी जमीन-खरेदी विक्री करणाऱ्या खंडू गोर्डे नावाच्या व्यक्तीला दिली होती. त्यांच्या मध्यस्थीने दिल्ली येथील एका साई भक्ताने ही इमारत खरेदी करण्यासाठी १ कोटी ११ लाख रुपयांत व्यवहार करून इमारत विकत घेण्याकरिता ५१ लाख रुपये इसार म्हणून दिले होते. परंतु खरेदीखत करून देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने दिल्ली येथील साईभक्त ॲड. मनोज कुमार, राजेंद्र कुमार यांनी शिर्डी पोलिसांत फिर्याद दिली.
फिर्यादीत म्हटले आहे, की मी निस्सीम साईभक्त आहे. मला शिर्डी येथे मिळकत अपेक्षित असल्याने खंडू गोर्डे यांच्या माध्यमातून हा व्यवहार केलेला होता. हा व्यवहार १ कोटी ११ लाख रुपयांत ठरलेला होता. एक जुलै २०२४ रोजी नोटरीदेखील करण्यात आली होती. त्या पोटी ८१ हजार, ९५ हजार रुपये ऑनलाइन, तर ७५ हजार फोन पेवरून असे २ लाख ५१ हजार रुपये दिले. राहिलेली रक्कम खरेदी खताच्या वेळी दिल्यानंतर घराचा ताबा देण्याचेदेखील ठरलेले होते. विजय छगनराव कुमावत यांनी वेळोवेळी अनेक कारणे देऊन माझे पैसे दिले नाहीत. तुम्ही उर्वरित पैसे दिले नाहीत, तर तुमचा ईसार बुडेल; तसेच नोटरीदेखील रद्द होईल असे मला सांगितले. त्यामुळे १ जुलै २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधी अखेर फोन पे, गुगल पे, बँक अकाउंटमार्फत ५१ लाख रुपये दिल्यानंतरही सदर इमारत व जागेची खरेदी करून विजय कुमावत देत नाही याबाबत या व्यवहारात मध्यस्थी असलेले खंडू गोर्डे यांना विचारले असता, त्याने विजय कुमावत हा फसवणूक करणारा आहे. असे मला फोनवर सांगितल्यानंतर या इमारत व जागेबाबत मी माहिती काढली असता, या इमारतीवर विजय कुमावत यांच्या पत्नीच्या नावाने जवळपास ४५ लाख रुपये कर्ज असून, त्याबाबत इमारतीवर बोजा असल्याचे समजल्याने वेळोवेळी पैशाची मागणी केली. खरेदीखत करून देण्यास नकार दिल्याने माझी जवळपास विजय छगनराव कुमावत यांनी ५१ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. दिल्लीतील साईभक्त मनोज कुमार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी विजय छगनराव कुमावत यांच्याविरुद्ध फसवणकीचा गुन्हा दाखल केला आहे.
विजय कुमावत याने या अगोदरदेखील शिर्डी शहरातील काहींची याच इमारतीच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार घडलेला होता. त्यात काहींना लाखो रुपयांचा फटका बसला होता. ती मंडळीदेखील आता विजय कुमावत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रणजित गलांडे करीत आहेत.