महापालिका निवडणूक स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी धुळेकरांना साद घालताना मात्र सिंचनाच्या ‘शिरपूर पध्दत’चा आधार घेतला. धुळ्यासाठी काँग्रेस नेमके काय करणार, हे त्यांनी गुलदस्त्यातच ठेवले.
महापालिकेसाठी रविवारी मतदान होत असून शुक्रवारी जाहीर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी येथील जुने अमळनेर स्थानक मैदानात मुख्यमंत्र्यांची सभा झाली. नागरीकरण आणि त्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्या ज्या दोन विभागांच्या माध्यमातून सोडविल्या जाऊ शकतात अशी नगरविकास आणि गृहनिर्माण ही दोन खाती आपल्याकडे आहेत, असे चव्हाण यांनी नमूद केले. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार एकहाती सोपविला तर कसा विकास करता येतो हे सिंचनाच्या शिरपूर पध्दतीवरून दिसून येईल. काँग्रेसने निरनिराळ्या महत्वाकांक्षी योजनांव्दारे सामान्य लोकाच्या जीवनात प्रकाश आणला आहे. राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना, अन्न सुरक्षा योजना ही त्याचीच उदाहरणे आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला जसे भरभरून यश दिले. त्याप्रमाणे महापालिका निवडणुकीतही द्यावे. काँग्रेस संपूर्ण ताकदीनिशी जिल्ह्य़ातील नेत्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आ. अमरिश पटेल, रोहिदास पाटील, विजय नवल पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शहर अध्यक्ष युवराज करनकाळ यावेळी उपस्थित होते.