भारतीय हवाई दलासाठी लढाऊ विमानांची बांधणी करणाऱ्या येथील हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड (एचएएल) कारखान्यातील भरतीत स्थानिक भूमीपुत्रांना डावलले जात असल्याचा आक्षेप घेत मनसेने परप्रांतीयांची भलामण करणारी लेखी प्रक्रिया उधळून लावण्याचा इशारा दिला तर शिवसेनेने याच मुद्यावरून प्रवेशद्वाराला टाळे ठोकून अधिकाऱ्यांना आतमध्ये कोंडले. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर एचएएल व्यवस्थापनाने भरती प्रक्रिया तुर्तास स्थगित ठेवण्याचे आश्वासन दिल्याचे उभय पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. मराठीच्या मुद्यावरून मनसे आणि शिवसेना यांनी परस्परांवर कुरघोडी करण्याचा आटापिटा चालविल्याचे अधोरेखीत झाले आहे.
एचएएल कारखान्यात ‘वर्कमॅन’च्या ३३४ जागांसाठी दिल्लीस्थित संस्थेमार्फत भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. यासाठी विविध ट्रेड्सच्या विद्यार्थ्यांना पदवी व पदविका परीक्षेच्या अंतीम वर्षांत अधिक गुण असलेल्यांनाच परीक्षेसाठी पात्र धरण्यात आले. त्यात महाराष्ट्रातील ८३ टक्के गुण असलेल्यांनाही डावलले गेले. या निकषामुळे संपूर्ण यादीत केवळ १८ विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले. सर्व पात्र विद्यार्थ्यांंनी २९ डिसेंबर रोजी लेखी परीक्षा होणार होती. याबद्दल स्थानिक उमेदवार व कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्यावर मनसे आणि पाठोपाठ शिवसेना या दोन्ही पक्षांनी सोमवारी आक्रमक भूमिका घेतली. मनसेचे आ. वसंत गिते, आ. उत्तम ढिकले आदी पदाधिकाऱ्यांनी ओझरच्या कारखान्यात धाव घेऊन या प्रक्रियेबाबत आक्षेप नोंदविले. महाराष्ट्रातील युवकांना डावलल्यास ही परीक्षा उधळून लावली जाईल तसेच परप्रांतीय विद्यार्थ्यांना नाशिकमध्ये येऊ दिले जाणार नाही, असा इशारा आ. गिते यांनी दिला. त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक या ठिकाणी पोहोचले. त्यांनी एचएएलच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. जवळपास चार तास हे आंदोलन सुरू राहिल्याने अधिकाऱ्यांना बाहेर पडता आले नाही. बाहेरील राज्यातील उमेदवारांना मोठय़ा प्रमाणात लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले. परंतु, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना निकषाचे कारण दाखवून डावलले गेल्याची तक्रार करंजकर यांनी केली. या घडामोडींमुळे एचएएल व्यवस्थापनाने २९ तारखेला होणारी लेखी परीक्षा स्थगित करण्याचे मान्य केल्याचे करंजकर यांनी सांगितले. दरम्यान, मराठी मुद्यावरून आधी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसेमुळे नाशिकमध्ये शिवसेनेचे पानिपत झाले आहे. भविष्यात पुन्हा असा फटका बसू नये म्हणून मनसेच्या बरोबरीने शिवसेना या विषयावरून आक्रमक झाली आहे.