शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे आमदार पद शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द ठरवले. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीवेळी खोतकर यांनी मुदत उलटून गेल्यानंतर उमेदवारी अर्ज भरला, असा आरोप गोरंट्याल यांनी याचिकेत केला होता. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्जुन खोतकर यांनी वेळ संपल्यानंतर स्थानिक उपविभागीय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे ते निवडणूक लढवण्यास पात्र नाहीत, असे याचिकेत म्हटले होते. या याचिकेवर आज न्यायमूर्ती नलावडे यांनी निकाल दिला. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीमध्ये खोतकर अवघ्या २९६ मतांनी विजयी झाले होते.
या निकालानंतर अर्जुन खोतकर यांनी आपण याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी उच्च न्यायालयाकडून खोतकर यांना ४ आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. मी अर्ज दाखल करण्यासाठी देण्यात आलेल्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरायला गेलो होतो. अर्ज भरण्यासाठी ३ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली असली तरी शेवटच्या दिवशी जितके जण निर्धारित वेळेत केंद्रावर दाखल होतात, त्या सर्वांचे अर्ज दाखल करून घेतले जातात. मी ३ वाजण्यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या परिसरात होतो. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या माझा अर्ज वैध ठरला पाहिजे, असे खोतकर यांनी सांगितले.
Aurangabad bench of Bombay High Court declares Shivsena MLA and Maharashtra Minister Arjun Khotkar's election nomination null and void as he had filed his nomination beyond deadline during elections in 2014. Court allowed Khotkar 4 weeks to appeal against the order in SC pic.twitter.com/qx0oVEVGvN
— ANI (@ANI) November 24, 2017
मागील २५ वर्षांत खोतकर यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष, तसेच राज्य बँकेचे संचालक म्हणून काम पाहिले. युतीच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. जालना सहकारी साखर कारखान्याचे संचालकपद म्हणूनही त्यांनी काम पाहिले. जि.प., पंचायत समिती, सहकारी खरेदी-विक्री संघ, ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था नगरपालिका आदी गाव ते जिल्हा पातळीवरील संस्थांच्या राजकारणात ते गेली २५ वर्षे सक्रिय आहेत. जालना शहर मतदारसंघातील निवडणुकीत ते अवघ्या २९६ मतांनी विजय झाले होते. या निवडणुकीत खोतकर यांना ४५ हजार ७८ व त्यांचे प्रतिस्पर्धी कैलास गोरंटय़ाल (काँग्रेस) यांना मिळालेल्या ४४ हजार ७८२ मते मिळाली होती. खोतकर यांनी २५ वर्षांपूर्वी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. १९९०मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. तेव्हापासून जिल्हय़ातील राजकारणात त्यांचे महत्त्व कायम राहिले. खोतकर यांनी आतापर्यंत विधानसभेच्या सहा निवडणुका लढविल्या. २००९चा अपवाद वगळता उर्वरित पाचही निवडणुका त्यांनी जालना मतदारसंघातून लढविल्या. त्यापैकी चार वेळेस विजय मिळविला. १९९९मध्ये जालना मतदारसंघात ३ हजार ८८४ मतांनी त्यांचा गोरंटय़ाल यांनी पराभव केला होता. विजयी झालेल्या चारही निवडणुकांत खोतकर यांचे मताधिक्य मोठय़ा प्रमाणावर कमी-जास्त होत राहिले. यंदाच्या निवडणुकीत केवळ २९६ एवढय़ा कमी मताधिक्याने विजयी झालेल्या खोतकरांचे १९९५च्या निवडणुकीतील मताधिक्य काँग्रेस उमेदवारापेक्षा जवळपास ४२ हजार होते. १९९०मध्ये हे मताधिक्य ३६ हजारांपेक्षा अधिक होते.