अहिल्यानगर: श्रीरामपूर शहरात मागासवर्गीय मुलींच्या दोनशे क्षमता असलेल्या वसतिगृहाला मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार हेमंत ओगले यांनी दिली. अधिक माहिती देताना आमदार ओगले यांनी सांगितले की, श्रीरामपूर येथे बहुसंख्येने मागासवर्गीय विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थिनींना राहण्याकरिता स्वतंत्र वसतिगृह नाही. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. निवास व भोजन सुविधाअभावी अनेक विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहतात. अशा परिस्थितीत शासकीय वसतिगृह उपलब्ध झाल्यास त्यांना सुरक्षित निवास व पोषणयुक्त भोजन, अभ्यासासाठी अनुकूल वातावरण व शैक्षणिक साहित्याची सुविधा मिळू शकते.

त्यामुळे मुलींच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळेल आणि सामाजिक व आर्थिक स्थर उंचावण्यास मदत होईल. मागासवर्गीय विद्यार्थिनींचे दोनशे क्षमता असलेले मंजूर करावे, अशी मागणी राज्याचे समाजकल्याण मंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने श्रीरामपूर येथे मुलींसाठी नवीन शासकीय वसतिगृहाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती आमदार ओगले यांनी दिली. या वसतिगृहासाठी शहरालगत असलेली शेती महामंडळाची जागा मिळवण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आमदार ओगले यांनी म्हटले आहे.