कर्जत : येथे झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत गैरवर्तन करून गोंधळ घालणाऱ्या श्रीरामपूर संघावर तीन वर्षांची बंदी घालण्याची मागणी कर्जतमधील कबड्डी खेळाडू, पालक व नागरिकांनी केली आहे. तसे निवेदन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. श्रीरामपूर संघावर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले की, कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात जिल्हास्तरीय १७ वर्ष वयोगटातील मुले व मुलींची कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
शुक्रवारी (दि. ३) दिवसभर मुले व मुलींचे सामने व्यवस्थित पार पडले. सायंकाळी मुलांचा अंतिम सामना कर्जत विरुद्ध श्रीरामपूर संघात सुरू झाला. अंतिम सामन्याचा पहिला डाव (हाफ) सुरळीत झाला. त्यावेळी कर्जत संघ एक गुणाने आघाडीवर होता. श्रीरामपूर संघाबरोबर तीन ते चार मोटारीतून तीस ते पस्तीस ग्रामस्थ टाकळीभान येथून तेथे आले होते. त्यांनी सामन्यामध्ये व्यत्यय आणण्याचे प्रयत्न सुरू केले. आयोजकांनी ध्वनिक्षेपकावरून त्यांना सातत्याने शांत राहण्याचे आवाहन केले. श्रीरामपूर संघाच्या प्रशिक्षकांना समज देण्यात आली, मैदानात येऊ नका, खेळाडूंना त्रास होईल अशा पद्धतीने वर्तन करू नका अशी सूचना करण्यात आली. त्यानंतर खेळाडूंना व पंचांना ताकीद देण्यात आली. एका खेळाडूला हिरवे व पिवळे कार्ड दाखवण्यात आले.
मात्र त्यानंतरही गैरवर्तन सुरू होते. एका चढाईच्या प्रसंगी श्रीरामपूरच्या खेळाडूने कर्जतच्या खेळाडूस कोपराने मारले. त्यात कर्जतचा खेळाडू जखमी झाला. त्यानंतर टाकळीभानहून आलेल्या ग्रामस्थांनी मैदानात शिरून गोंधळ घातला. सामना बंद पाडण्याचे प्रयत्न पूर्वनियोजित दिसत होते. जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा अधिकारी भाऊसाहेब वीर, पंच, क्रीडा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सामना सुरू करण्याची सूचना अनेकवेळा देऊनही श्रीरामपूर संघाचे प्रशिक्षक व खेळाडूंनी त्यांच्यासोबत आलेल्या लोकांच्या सांगण्यावरून खेळण्यास नकार दिला. सर्वांना सुमारे अडीच तास वेठीस धरले. अखेर क्रीडा अधिकारी वीर यांनी कर्जतचा संघ विजय घोषित केला.
श्रीरामपूर संघातील खेळाडू व ग्रामस्थांचे वर्तन खेळभावनेला पोषक नव्हते. या सर्व घडामोडी श्रीरामपूरचा संघ दोषी आहे. त्यामुळे त्यांच्यावर तीन वर्षांची बंदी घालावी व श्रीरामपूर संघाची अनधिकृत फेरसामना घेण्याची मागणी मान्य करू नये, अन्यथा कर्जत संघातील खेळाडू व ग्रामस्थ जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यासमोर उपोषण करतील, असाही इशारा निवेदनात देण्यात आला आहे.