अहिल्यानगर : तलवारी घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या व्यावसायिकाचे दुकान पेटवून देणाऱ्या टोळक्याच्या निषेधार्थ शहराजवळील एमआयडीसी परिसरातील इसळक व निंबळक या गावांमध्ये आज, सोमवारी ग्रामस्थांनी बंद पाळला. रास्तारोको आंदोलनही केले. दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्यातील आठ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यातील पाच जणांना अटक केली असून एका विधीसंघर्षग्रस्त मुलासहित ताब्यात घेण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संतोष रघुनाथ धोत्रे (२७, नागापूर, एमआयडीसी), अजय उर्फ मठ्ठास सोमनाथ गुळवे (२७, एमआयडीसी), तुषार लहानू पानसरे (१९, साईराजनगर, नवनागापूर), सुधीर प्रदीप दळवी (२३, नागापूर, एमआयडीसी), आबा उर्फ राहुल नाथा गोरे (३५, नागापूर) या पाच जणांना अटक करण्यात आली तर आणखी एक विधीसंघर्षीत मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिली.

एमआयडीसी परिसरातील गावांना टोळक्याच्या दहशतीचा वारंवार सामना करावा लागत आहे. काल, रविवारी सायंकाळी टोळक्याने राजेंद्र व संदीप कोतकर या दोघांच्या किराणा दुकानावर उसने पैसे देत नसल्याच्या कारणातून तलवारी, लोखंडी रॉड, लोखंडी घन याने हल्ला करून मोडतोड केली तसेच राजेंद्र, संदीप, चुलते कोंडीबा कोतकर व त्यांची पत्नी चंद्रभागा यांना मारहाण करून जखमी केले. पेट्रोल टाकून दुकान पेटवून दिल्याच्या आरोपावरून ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचे पडसाद आज, सोमवारी निंबळक व त्या शेजारील इसळक गावांमध्ये उमटले. एमआयडीसीतील कामगार या परिसरात मोठ्या संख्येने राहतात. ग्रामस्थांनी सोमवारी बंद पाळून, रास्ता रोको आंदोलनही केले. सोमनाथ खांदवे, बी. डी. कोतकर, राजेंद्र कोतकर, सदा रोहकले, घनश्याम म्हस्के आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. अटक केलेल्या आरोपींविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.

गेल्या आठवड्यातच एमआयडीसीमध्ये दोन टोळ्यांच्या वादातून एका युवकाचे अपहरण करून खून करण्यात आला तसेच त्याचा मृतदेह नंतर डिझेल टाकून जाळण्यात आला. यासंदर्भात तोफखाना पोलिसांनी ९ जणांना अटक केली. एमआयडीसीतील उद्योजकांनी यापूर्वी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करत एमआयडीसी दहशतमुक्त करा, अशी मागणी पूर्वीच केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shutdown in villages of ahilyanagar midc area against gang terror block the way ssb