Sindhutai Sapkal Organisation : गेल्या काही वर्षांत लग्नाच्या आमिषाने अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. उपवर वरांना हेरून त्यांना सामाजिक संस्थांमध्ये वाढलेल्या मुलींशी लावून देण्याचे आमिष दाखवले जाते. त्याकरता त्यांच्याकडून पैसे उकळले जातात अन् प्रत्यक्षात त्यांची फसवणूक केली जाते. असाच प्रकार आता सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांच्या संस्थेच्या नावाने फसवणूक सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सिंधूताई सपकाळ यांच्या कन्या ममता सिंधूताई यांनी याविरोधात सोशल मीडियावरून आवाहन केलं आहे. अशा अफवांना बळी न पडण्याचं आवाहन त्यांनी केलंय.

ममता सिंधुताई म्हणाल्या, “माई, पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या नावाने सोशल मीडियावर खोटे अकाउंट तयार करून, त्यावर लग्नासाठी मुली आहेत असं भासवून, त्यासाठी अमुक एक रक्कमेचा उल्लेख करून आपल्या मुलांसाठी मुलगी शोधत असणाऱ्यांची फसवणूक करणाऱ्याच्या सध्या मी शोधात आहे. दुसऱ्याच्या गरजांचा फायदा उठवणारे हे जे कोणी आहेत त्यांना कशाचीही भीती का बरे वाटत नसेल?” असा सवाल त्यांनी विचारला.

“मध्यंतरी मी, दीपक दादा व विनय, आम्ही एक व्हिडिओ करून त्याद्वारे सध्या संस्थेत लग्नासाठी मुली नाहीत हे सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. पण आजच्या समाजाचं चित्रच इतकं विदारक आहे की लग्नासाठी मुलीच मिळत नाहीयेत. त्यामुळे अशा जाहिरातींना लोकं बळी पडताना दिसत आहेत. आम्ही पोलिसांची मदत सुद्धा घेणार आहोतच. पण त्याचबरोबर ठराविक काळाने ह्या पोस्ट सोशल मिडियावर टाकत राहणार आहोत”, अशी माहिती ममता सिंधुताई यांनी दिली.

हवालदिल मनस्थितीचा फायदा उचलणारे नीच मानसिकतेचे

“मुळात आजवर आमच्या संस्थेमध्ये जितके विवाह पार पडले ते जणू घरातली लेकबाळ सासरी जाते आहे या हेतूनेच तिची रीतसर पाठवणी केली गेली आहे. त्यासाठी आम्ही मुलाकडून एक पैसा घेतलेला नाही आणि या जाहिराती बघाल तर त्यात पैशाच्या बदल्यात केवळ आमिष दाखवलेलं दिसून येत आहे. आजच्या घडीला माईंच्या कुठल्याही संस्थेत लग्नासाठी मुलीच नाहीयेत. कारण ज्या आहेत त्या आपलं शिक्षण पूर्ण करत आहेत. त्या त्यांच्या पायावर उभ्या झाल्याशिवाय संस्था त्यांना लग्नासाठी आग्रह करणारच नाही. अजून किमान तीन वर्षे तरी संस्थेत लग्न नाही. आणि हेच आम्ही दररोज आम्हाला येणाऱ्या फोनवर सांगत असतो. अशा वेळी सुंदर मुलींचे फोटो दाखवून जर लग्नासाठी मुलगी हवी असेल तर आधी गेट पास काढा आणि त्यासाठी पंधरा हजार ऑनलाइन भरा अस सांगणारे विकृतच म्हणू नये तर काय म्हणावं? आधीच समाजातील मुलींची संख्या कमी असताना, नवऱ्या मुलासाठी मुलगी मिळत नसताना अशा हवालदिल आईबापांच्या मनस्थितीचा फायदा उचलणारे किती नीच मानसिकतेचे असतील याची कल्पना न केलेलीच बरी”, असंही त्या म्हणाल्या.

“म्हणूनच ही पोस्ट जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी आहे. माईंच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या कृत्यांना वेळीच आळा घातला पाहिजे नाहीतर भोळ्या भाबड्या लोकांची फसवणूक यापुढेही होत राहील. माझी सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या आसपास जर कोणी अशा पद्धतीने कुणाची फसवणूक करत असेल तर तो प्रकार लगेच उघडकीस आणा. संस्थेशी संबंधित संपर्क नंबर आहेत त्यावर कळवा. खात्री करून घ्या आणि अशा भूलथापांना बळी पडू नका. सोबत स्क्रीनशॉट जोडले आहेत”, असं आवाहनही ममताताईंनी केलं आहे.

“गेल्या चार दिवसांत बऱ्याच ठिकाणाहून मला हे स्क्रीनशॉट आले आहेत. यामध्ये जे मोबाईल नंबर आहेत त्यावर मी फोन करून झाले आहे. सुरुवातीला मलाही हा सिंधुताई सपकाळांचा महिलाश्रम आहे असं सांगण्यात आलं. जेव्हा मी त्यांचीच मुलगी बोलते आहेत म्हणाले तेव्हा फोन कट केलाय. माझ्याकडे ते ही रेकॉर्डिंग आहे”, असं ममता सिंधुताई पुराव्यानिशी म्हणाल्यात.