सोलापूर : देवकार्यात पत्नीला खांद्यावर उचलून नाचल्याचा राग मनात धरून भावजयीने दिराचा चाकूने भोसकून केल्याची धक्कादायक घटना अलीकडेच बार्शीजवळ घडली असताना त्यानंतर खाण्यासाठी तंबाखू न दिल्याचा राग धरून जीवघेणा हल्ला करण्याचे दोन प्रकार माळशिरस व करमाळा येथे घडले आहेत. या दोन्ही घटनांची नोंद करून पोलिसांनी संबंधित हल्लेखोरांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

माळशिरस तालुक्यातील मोरोची गावात खाण्यासाठी तंबाखू दिली नाही म्हणून दोघाजणांनी उमाजी जयदीप जाधव या तरुणावर सशस्त्र जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी सचिन पांडुरंग खिलारे (वय २६) आणि ऋत्विक बाळू जगताप (वय २५, दोघे रा. मोरोची) या दोघांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. जखमी उमाजी जाधव हा गावात मोरजाई मंदिराजवळ सायंकाळी बसला असता सचिन खिलारे व ऋत्विक जगताप यांनी त्यास खाण्यास तंबाखू मागितली. तंबाखू नसल्याने त्याने दिली नाही. त्यामुळे अपमान वाटून घेत दोघांनी त्याच्यावर जोरदार प्रहार केला. डोक्यावर, हाता-पायावर जबर हल्ला करून त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर दोघे हल्लेखोरांनी पळ काढला. नातेपुते पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : “ते ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील, पण…”; राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्याच्या घटनेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

हेही वाचा – सोलापूर : नदीत पडलेल्या शेळीला वाचविताना नदीच्या प्रवाहात तरुण वाहून गेला

दुसरा प्रकार करमाळा तालुक्यात जिंती गावाजवळ घडला. गावाजवळील स्मशानभूमीजवळून अर्जुन मुरलीधर शेलार (वय ५०, रा. जिंती) हे जात असताना त्यांच्या ओळखीचा राहुल ज्ञानदेव काळे (वय २८) याने त्यांना अडवून खाण्यासाठी तंबाखू मागितली. तेव्हा जवळ तंबाखू नसल्यामुळे नकार देताच संतापलेल्या राहुल याने पडलेला मोठा दगड उचलून अर्जुन यांच्या डोक्यावर मारला. यात मोठा रक्तस्त्राव होऊन ते गंभीर जखमी झाले. करमाळा पोलीस ठाण्यात राहुल काळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.