सोलापूर : मध्य रेल्वे सोलापूर मंडळाच्या सहायक अभियंता कार्यालयाच्या आवारातील परप्रांतीय मजुरांपैकी एकाने दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता ते न दिल्याने एकाच्या डोक्यात लोखंडी हत्याराने जोरदार प्रहार करून त्याचा खून केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

बबलू गोपाल अधिवासी (वय २०, मूळ रा. कल्हार, ता. गंजबासुधा, जि. बिडिया, मध्य प्रदेश) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याचा खून त्याच्या वडिलांच्या समक्ष झाला. त्याचे वडील गोपाल रामू अधिवासी (वय ५४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अखलेश समेश्वर बुनकर (वय २४, रा. हुजूर, जि. अमिलकी रिवा, मध्य प्रदेश) याचे नाव आरोपी म्हणून निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा – शाळकरी मुलांच्यात वाढता दृष्टिदोष!

हेही वाचा – महायुतीमध्ये ‘जनसुराज्य’कडून मिरज, जत मतदारसंघांचा आग्रह

गोपाल अधिवासी व त्यांचा मृत मुलगा बबलू हे दोघे मध्य प्रदेशातील मजुरांच्या एका टोळीसोबत सोलापुरात आले होते. मध्य रेल्वे सोलापूर मंडळ सहायक अभियंता कार्यालयाशी निगडीत रंगकामे करण्यासाठी हे मजूर तेथेच राहायचे. रात्री कार्यालयाच्या आवारात पत्राशेडसमोर बबलू हा थांबला असता त्यास अखलेश बुनकर याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. तेव्हा बबलू याने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे अखलेश याने चिडून त्यास, तुला आता सोडणार नाही, असे धमकावले होते. दरम्यान, गोंधळ वाढल्याचे पाहून बबलू याचे वडील गोपाल अधिवासी हे तेथे आले. त्याचवेळी अखलेश याने लोखंडी हत्याराने बबलू याच्या डोक्यात प्रहार केला. यात डोक्यात प्रचंड रक्तस्त्राव होऊन बबलू हा बेशुद्ध पडला. त्यास शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अखलेश याने पलायन केले असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.