पंढरपूर : युवा महोत्सव म्हणजे तरुणाईचा जल्लोष असतो. या जल्लोषातून विद्यार्थी कलाकार आपली अभिव्यक्ती मांडण्याबरोबरच कलेतून प्रबोधन करत असतात. लोककलेच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे घेऊन जाता येतो. आज ओवी, पिंगळा या लोककला लोप पावत चालल्या आहेत. युवा महोत्सवातून नव्या पिढीने लोककला व लोकसंस्कृतीचे जतन केले पाहिजे, असे आवाहन सुप्रसिद्ध लोककलाकार व लोककलेचे अभ्यासक डॉ. योगेश चिकटगावकर यांनी केले.
सांगोला महाविद्यालय, सांगोला येथे आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २१ व्या ‘उन्मेष सृजनरंग’ युवा महोत्सवाचे उद्घाटन डॉ. योगेश चिकटगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर होते.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, सांगोला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी ७ ते १० ऑक्टोबर या कालावधीत चालणाऱ्या युवा महोत्सवात नृत्य, नाट्य, ललित, वाङ्मय आणि संगीत विभागातील एकूण ३९ कला प्रकारांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
या महोत्सवात सोलापूर विद्यापीठाच्या संलग्नित एकूण ५५ महाविद्यालयांचा सहभाग असून, जवळपास १२०० हून अधिक विद्यार्थी कलाकार आपली कला सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना चिकटगावकर म्हणाले, लोककला, लोकसंस्कृती या मनोरंजनाबरोबरच प्रबोधनाचे महत्त्वाचे साधन आहे. यावेळी चिकटगावकर यांनी जात्यावरील ओवी, पिंगळा सादर करून पूर्वीच्या काळातील संस्कृतीचे दर्शन घडवले. कुलगुरू डॉ. महानवर म्हणाले की, सोलापूर जिल्ह्याने आज मोठे कलाकार घडवले आहेत. आज त्यांचाच वारसा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ पुढे घेऊन जात आहे. स्पर्धा म्हटले की हार, जीत असते. त्यामुळे दोघांचाही अनुभव महत्त्वाचा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी युवा महोत्सवाचा आनंद लुटावा व आयुष्यात पुढे जावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन संतोष कांबळे व डॉ. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार डॉ. सुरेश भोसले यांनी मानले. या महोत्सवात सोलापूर विद्यापीठाच्या संलग्नित एकूण ५५ महाविद्यालयांचा सहभाग असून, जवळपास १२०० हून अधिक विद्यार्थी कलाकार आपली कला सादर करणार आहेत.