तेच ते खोटे आरोप वारंवार करणाऱ्यांचे ढोंग लवकरच उघडकीस आणणार आहोत. पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत असताना तेव्हाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन राज्यात दंगली घडवण्याचा काहींचा हेतू होता, असे खळबळजनक विधान कोल्हापूरचे पालकमंत्री तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.
येथे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना मंत्री केसरकर म्हणाले, आम्ही आमच्यावरील अन्याय झाल्याची भूमिका मांडत आलो आहोत. वास्तव लोकांना सांगितल्याने राज्यानेही त्यावर विश्वास ठेवला म्हणूनच दंगली झाल्या नाहीत. पक्षातून बाहेर पडत असताना अनेक आरोप केले. त्यात पक्षात नसणारेही काहीही बोलत राहिले. खोट्या गोष्टींचे भांडवल केले गेले. राज्यात घडलेल्या चुकीच्या गोष्टींना ही मंडळी जबाबदारी असताना त्याची आमच्यावर जबाबदारी ढकलली जात असल्याने वस्तुस्थिती महाराष्ट्राला समजावी यासाठी भूमिका मांडली जाणार आहे.
राज्य शासनामध्ये सहभागी असलेले बच्चू कडू व रवी राणा यांच्यात वाद सुरू आहे. याविषयी मंत्री केसरकर यांनी या दोघातील वाद मिटवण्यासाठी तडजोड करण्यात आली. त्यानंतरही सन्मान राखला जात नसेल तर पक्ष म्हणून काही निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.