सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावर २९ जुलै रोजी वराडे (ता. कराड) येथे एसटी बसमधील कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून ९२ तोळ्यांचे दागिने आणि ३२ हजार रुपये रोख असलेली पिशवी जबरीने चोरण्यात आली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ९२ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम, तसेच गुन्ह्यात वापरलेली गाडी असा ७७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली.
याप्रकरणी राहुल दिनेश शिंगाडे (शिंगणापूर ता माण), महावीर हनुपंत कोळपे (बिवी ता फलटण), अभिजित महादेव करे (रावडी, ता. फलटण), अतुल महादेव काळे (भांब, ता. माळशिरस) या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसेच या गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडीसुद्धा जप्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर, हवालदार हसन तडवी, मनोज जाधव, प्रवीण कांबळे, प्रवीण पवार या पथकाने फिर्यादीची संपूर्ण माहिती घेऊन त्या पद्धतीने तपास सुरू केला. शिंगाडे व कोळपे यांना ताब्यात घेतले. आरोपी महावीर कोळपे हा कृष्णा कुरिअर, कोल्हापूर येथे नोकरीस होता. त्याला कुरिअर कंपनीचा कर्मचारी सोन्याचे दागिने कधी घेऊन जातो हे माहीत होते. तो संदर्भ घेऊन तपास सुरू झाल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार संबंधितांना अटक केली आहे. आरोपी अतुल काळे याने घराजवळील उकिरड्यामध्ये लपवून ठेवलेले ९२ तोळे दागिने व सोन्याची बिस्किटे पोलिसांना तपासात सुपूर्द केली.
आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसेच या गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडीसुद्धा जप्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ७७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली.
या कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला. या पथकाचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी अभिनंदन केले आहे.