राज्यामध्ये सुरु असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे. एसटीकडून प्रत्येक प्रवाशावर एक रुपया कर आकारला जातो. एसटी प्रवाशांकडून महिन्याला २१ कोटी रुपये वसूल करत असते. हा सर्व पैसा ‘मातोश्री’त जातो, असं पडळकर एसटी कर्मचाऱ्यांसमोर बोलताना म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एसटी कर्मचाऱ्यांचा संपासंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेऊन तातडीने कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतर देखील संप सुरूच असल्यामुळे अखेर एसटी महामंडळाने न्यायालयात संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात आणि कर्मचारी संघटनांविरोधात न्यायालय अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. असं असतानाच दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच पडळकर यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नव्याने भर पडणार आहे.

गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आझाद मैदानात शेकडो आंदोलक जमले असून त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. यावेळी पडळकर यांनी एसटीतील भ्रष्टाचारावरून ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला.

“एसटी महामंडळाकडून एक रुपया प्रत्येक प्रवाशावर कर आकारला जातो. एसटीने रोज ६५ लाख प्रवासी रोज प्रवास करत असतात. रोज ६५ लाख, महिन्याचे झाले किती? २१ कोटी. वर्षाचे झाले किती? पैसे जातात कुठे? हे पैसे मातोश्रीत जातात. एवढा हे भ्रष्टाचार करतात. कर्मचाऱ्यांना काहीच देत नाही,” असं पडळकर म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St workers strike bjp leader gopichand padalkar says cm uddhav thackeray is doing corruption scsg