जळगावकरांना दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा ; वेळापत्रकही विस्कळीत

एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. अद्याप त्यात कुठलीही सुधारणा झाली नाही

जळगाव : धरणात मुबलक जलसाठा असूनही काही दिवसांपासून शहरात दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. पिवळसर आणि शेवाळयुक्त पाणी येत असल्याने जळगावकरांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. सध्या नियोजित वेळापत्रकाच्या सहा ते आठ तास उशिराने पाणीपुरवठा होत आहे.

शहराला वाघूर प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. प्रकल्पस्थळीच जलशुद्धीकरण केंद्र आहे. तेथेच प्रक्रिया करून पाणीपुरवठा केला जातो. शहरासाठी महापालिकेचे आठ-दहा जलकुंभ उभारण्यात आले आहेत. त्यातील दोन जलकुंभांचे बांधकाम पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहे. वाघूर प्रकल्पातून आठही जलकुंभ भरले जातात. शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. सध्या वाघूर प्रकल्पातही मुबलक जलसाठा आहे. धरणात शहराला दोन वर्षे पुरेल इतका जलसाठा आहे. तरीदेखील दुर्गंधीयुक्त, पिवळसर पाणी येत असल्याने जळगावकर हैराण झाले आहेत.

एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. अद्याप त्यात कुठलीही सुधारणा झाली नाही. नियोजित वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. पिंप्राळा उपनगरात गृहिणींना रात्र जागून काढावी लागते. पाणीपुरवठा कधी होईल, याची शाश्वती नसते.

 पिवळसर, शेवाळयुक्त पाणी येत असल्यामुळे गृहिणींना ते गाळून व उकळून घ्यावे लागते, पिंप्राळा उपनगरातील पाणी प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. पिवळसर पाण्याबद्दल अनेक भागांतून तक्रारी येत आहेत. सुरळीत पाणीपुरवठय़ासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज असताना महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग उदासीन असल्याची संतप्त भावनाही उमटत आहे. पाण्याची तपासणी करून ते पिण्यालायक आहे का, याचा महापालिका प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पाण्याचे नमुने घेऊन महापालिकेवर धडक दिली होती.

दूषित पाणीपुरवठय़ाच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेच्या आयुक्त विद्या गायकवाड यांनी वाघूर पाणीपुरवठा योजनेवरील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. वितरणातील त्रुटींमुळे दूषित पाणी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 जलकुंभांची स्वच्छता करावी

शहरात असलेल्या जलकुंभांची वर्ष-दीड वर्षांपासून स्वच्छता केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठय़ाचे ते कारण आहे. प्रत्येक जलकुंभ २८ दशलक्ष लिटर क्षमतेचा आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी आदल्या दिवशी सायंकाळी जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरून दिला जात होता. मात्र, गेल्या महिन्यापासून जलकुंभ अवेळी म्हणजे पाणीपुरवठा होण्यापूर्वीच भरले जातात. तेही अपूर्ण क्षमतेने. त्यामुळे पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याचे सांगितले जात आहे.

नियोजित वेळापत्रकानुसार सध्या पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. येत्या आठ दिवसांत पुन्हा नियोजित वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा होईल. तसेच पिवळसर पाण्याबाबतही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मागविण्यात आले असून, त्यावर उपाययोजना सुरू आहेत. – कुलभूषण पाटील, उपमहापौर, जळगाव.

सध्या कडक उन्हामुळे पाण्याचा रंग पिवळसर आणि शेवाळयुक्त होत आहे. पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबत उपाययोजना केली जात आहे. – गोपाळ लुल्हे, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका, जळगाव

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Stinking water supply to jalgaon residents zws

Next Story
कोणत्याही कारखान्याला ऊस देण्याचे स्वातंत्र्य फायदेशीरच ; केंद्रीय कृषिमूल्य आयोगाची शिफारस
फोटो गॅलरी