राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर चारा छावणी बंद करण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. बीडमधले चारा छावणी मालक उद्यापासून छावणी बंद करणार होते. मात्र शरद पवारांशी चर्चा घेतल्यानंतर या निर्णयाला त्यांनी स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांच्या सगळ्या अडचणी मी शासनाकडे पोहचवण्याचा प्रयत्न करेन असं आश्वासन शरद पवार यांनी दिलं आहे. एवढंच नाही तर सरकारने कोणतेही राजकीय मतभेद न ठेवता शेतकऱ्यांसाठी सढळ हाताने मदत केली पाहिजे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्याच्या दुष्काळी दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी बीड जिल्ह्यातील पाटोदा या ठिकाणी असलेल्या सौताडा गावातल्या छावणीला भेट दिली. ही छावणी २७ मार्चला सुरू झाली. मात्र या छावणीचे अनुदान अद्याप सरकारतर्फे सुरू झालेले नाही. त्यामुळे व्याजाने पैसे घेऊन ही छावणी चालवण्याची वेळ मालकांवर येते आहे. दुधाचे दर दोन रूपयांनी घटले आहेत. उत्पादन घटलेले असताना शेतकरी वर्गावर हे संकटही आहे. या सगळ्या समस्या शरद पवारांनी ऐकून घेतल्या.

छावणी चालकांनी एक नवी समस्या सांगितली ती अशी की जनावरांना टॅग लावला जातो. जनावरांची संख्या अचूक असावी त्यात फेरफार होणे टाळावे हे शासनाचा उद्देश आहे. मात्र टॅग लावल्यानंतर त्या जनावराची नोंद शासनदरबारी होण्यास वेळ लागतो. त्यासाठी एक स्वतंत्र नियुक्ती करण्यात यावी अशीही मागणी होते आहे. असे झाल्यास छावणीवरचा अतिरिक्त भार कमी होईल असेही छावणी चालकांनी सांगितले. शरद पवार यांनी रस्त्यात थांबूनही काही शेतकऱ्यांशी संवाद साधला. तेव्हा काही महिलांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspending the decision to close the fodder camp in beed after a discussion with sharad pawar