नृत्याचा सराव सुरू असताना ११ वर्षाच्या विद्यार्थ्याकडून चूक झाल्यामुळे नृत्य-शिक्षकाने तिला काठी फेकून मारली. त्यामुळे या विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. शिक्षकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाली.जानेवारी महिन्यात शालेय स्तरावर जिल्ह्यात सगळीकडे स्नेह संमेलन सुरू आहेत. विविध वयोगटातील मुलांना या स्नेहसंमेलनात सहभागी होण्याची हौस असते. या कोवळ्याशा वयात कोणी नृत्याद्वारे तर कोणी गायनाद्वारे आपल्यातील कला जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतात.

या काळात विद्यार्थ्यांकडून सराव करुन घेऊन त्यांना प्रेमाने समजावून वेळ प्रसंगी रागवून त्यांच्यातील कलेला घडवणारे नृत्य शिक्षक सगळीकडे पहावयास मिळतात. परंतु नृत्य करत असताना एखादी छोटीशी चूक घडल्यास कोणी वार करत असेल तर काय होईल?
घोटी येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ही घटना घडली. ११ वर्षीय एका मुलाला नृत्य चालू असतांना मागे पाहिले म्हणून काठी फेकून मारण्यात आली. पालकांनी या शिक्षका विरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.

घोटीतील टाके शिवारातील पंचवटी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्नेहसंमेलनात हा प्रकार घडला. या शाळेत चौथीच्या वर्गातील माणिक गोरे या विद्यार्थ्यास मारहाण झाली. शाळेतील क्रीडा सभागृहामध्ये बुधवारी नृत्य सराव सुरू होता. सराव सुरू असतांना त्याने मागे वळून पाहिले या कारणावरून संशयित नृत्य शिक्षक रतन शर्मा याने त्याच्या दिशेने हातातील काठी फेकून मारली. काठी नेमकी त्याच्या डोक्याला बसल्याने त्याच्या डोक्याला जखम होऊन रक्तस्त्राव सुरू झाला. घडलेला हा प्रकार त्याच्या पालकांना समजल्यानंतर त्यांनी रतन शर्मा याच्याविरूध्द इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.