रत्नागिरी: लांजा तालुक्यातील  कुर्णे येथील राखीव वनक्षेत्रात सागवानाच्या झाडांची मोठी  चोरी  झाल्याचे  उघडकीस आले आहे. वन विभागाने केलेल्या  कारवाईत हा सर्व प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वनपाल आणि वनरक्षक यांच्या फिरती दरम्यान दि. ३० ऑगस्ट रोजी सात साग झाडांची अवैध चोरी झाल्याचे निदर्शनास आले होते. यातील काही लाकूड जागेवर होते. तर काही लाकूड गायब करण्यात आले होते. या घटनेनंतर भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याविषयी तपास करताना दि. २४ सप्टेंबर रोजी सात संशयित आरोपींना अटक करण्यात आले आहे. यामध्ये  मनोज संजय पाटणकर, मंदार संजय पाटणकर, अजय नागूप्रसाद निषाद, शत्रुघ्न दत्ताराम गोठणकर, विजयकुमार रामशंकर निषाद, मंदार मनमोहन बारस्कर आणि शुभम रवींद्र गुरव (सर्व रा. कुंभवडे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी रातोरात क्रेनच्या साहाय्याने ट्रकमध्ये लाकूड भरून कुर्णे येथून कुंभवडे येथे लाकडाची वाहतूक केली. त्यानंतर मुद्देमाल दुसऱ्या ट्रकमध्ये भरुन  माडबन येथील पठार भागात लपवून ठेवला होता. आरोपी मनोज पाटणकर याच्या कबुलीजबाबानंतर ही माहिती उघडकीस आली आहे.

या कारवाईत वन विभागाने एकूण ३१ साग झाडांचा (७.४९५ घ.मी.) मुद्देमाल जप्त केला असून, त्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे ३ लाख १४ हजार ७९० रुपये इतकी आहे. हा माल वनाधिकारी राजापूर यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. तसेच लांजा येथे  वापरण्यात  आलेली क्रेन ( एमएच ०९ जीएम ०४५२) जप्त करण्यात आली आहे. तसेच  गुन्ह्यात वापरलेल्या इतर वाहने आणि साधनसामग्रीचा तपास करण्यात येत आहे.