अहमदनगर सात अंशांवर, शनिवारपर्यंत विदर्भाचा पारा आणखी घसरणार

गेल्या काही वर्षांच्या तुलनेने उबदार गेलेल्या डिसेंबरनंतर यंदा जानेवारीच्या पहिल्याच आठवडय़ात थंडीने कमाल दाखवायला सुरुवात केली असून राज्यातील उत्तर  भागात तापमापकातील पारा खाली घसरू लागला आहे. गुरुवारी अहमदनगर येथे किमान ७ अंश से. तापमानाची नोंद झाली. या ऋतूतील राज्यातील हे सर्वात कमी तापमान आहे. विदर्भातील बहुतांश भागात थंडी पडली असून तिथे पुढील दोन दिवस थंडीची लाट असण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे पश्चिम भागातही किमान तापमानात एक ते तीन अंश से. ने घसरण होण्याची शक्यता आहे. एकूण सारेच राज्य दोन दिवसांत पुरते गारठणार आहे.

देशातील उत्तरेकडील राज्ये थंडीने गारठली असून त्याचा परिणाम आता महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. मुंबईतील या ऋत्रूमधील सर्वात कमी तापमानाची नोंद दोन दिवसांपूर्वी झाल्यावर गुरुवारी राज्यातील या मोसमाचे सर्वात कमी तापमान अहमदनगर येथे नोंदले गेले.

विदर्भात गुरुवारपासून थंडीची लाट आली असून शुक्रवार व शनिवारीही किमान तापमानात सरासरीपेक्षा तीन ते पाच अंश से. ने घसरण होण्याचा अंदाज केंद्रीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. गेल्या दहा वर्षांतील हवामानाची आकडेवारी पाहता डिसेंबरपेक्षा जानेवारीत तापमानात अधिक घसरण होते. मुंबईत गेल्या दहा वर्षांत जानेवारीमध्ये अनेकदा तापमान ११ अंश से.पर्यंत खाली उतरले आहे.